धारावीतील पालवाडी, क्रॉस रोडची दैना

Dharavi
धारावीतील पालवाडी, क्रॉस रोडची दैना
धारावीतील पालवाडी, क्रॉस रोडची दैना
धारावीतील पालवाडी, क्रॉस रोडची दैना
धारावीतील पालवाडी, क्रॉस रोडची दैना
See all
मुंबई  -  

धारावीतील पालवाडी आणि क्रॉस रोड रस्त्यांची अक्षरश: दैना झाली आहे. मातीचा कच्चा रस्ता, त्यावर पडलेले खड्डे आणि पाणी साठून जागोजागी तयार झालेला चिखल, यामुळे स्थानिकांना या वर्दळीच्या रस्त्यांवरून चालणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती आणखीनच बिकट होणार आहे. हे दोन्ही रस्ते पक्के करण्यासाठी स्थानिकांनी येथील लोकप्रतिनिधींना वारंवार विनंत्या, अर्ज केले. परंतु अद्याप या रस्त्यांच्या कामाला सुरूवात होऊ शकलेली नाही.

पालवाडी आणि क्रॉस रोड या दोन्ही रस्त्यांच्या परिसरात राहणारे हजारो स्थानिक या रस्त्यांचा वापर करतात. असे असूनही महापालिकेला येथे पक्का रस्ता बांधता आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांप्रमाणे स्थानिक या रस्त्यांचा वापर करत आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे रस्ता दुरूस्तीच्या कामांचे उद्घाटन केले. पोकळ आश्वासने दिली. पण पावसाळा तोंडावर येऊनही रस्त्याच्या कामाला सुरूवात होऊ शकलेली नाही.

याप्रश्नी 'हेल्पिंग हँड फाऊंडेशन'चे अध्यक्ष सीमोन राजा यांनी याबाबत स्थानिक नगरसेविका, आमदार वर्षा गायकवाड, तसेच जी/ उत्तर विभागाला लेखी तक्रार देखील केली. तरीही पालिकेने रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेतलेले नाही. यामुळे पावसाळ्यात या मातीच्या कच्च्या रस्त्यावर चिखल साचून वृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार हे निश्चित आहे. मग या त्रासाची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जी/उत्तर विभागातील अधिकारी स्वीकारणार का? असा प्रश्नही राजा यांनी उपस्थित केला आहे.

महापालिका आयुक्तांनी 15 मे नंतर नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यास मज्जाव केला आहे. तसेच जी कामे सुरू आहेत, ती पावसाळ्या आधी शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आदेशही सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा स्वरूपात अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याचे काम मार्गी लावायला पाहिजे होते. परंतु तसे झालेले नाही.

यासंदर्भात स्थानिक नगरसेविका रेश्मा वकील शेख म्हणाल्या की, या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी लागणाऱ्या काही कच्च्या मालावर जिल्हाधिकारी यांनी तूर्तास बंदी घातलेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासोबत बोलणी सुरू असून कंत्राटदाराला कच्चा माल मिळताच पावसाळ्यापुर्वी स्थानिकांना चालण्यालायक रस्ता बनवून देऊ व उर्वरित कामे पावसाळ्यानंतर पूर्ण करू.

स्थानिक नगरसेविकाच्या आश्वासनानुसार पावसाळ्याअगोदर दोन्ही रस्त्यांच्या दुरूस्तीचे कामे पूर्ण होतील, याचीच स्थानिक प्रतिक्षा करत आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.