Advertisement

मुंबईकरांची पुन्हा 'लोकलकोंडी'


मुंबईकरांची पुन्हा 'लोकलकोंडी'
SHARES

२९ ऑगस्टच्या मुसळधार पावसात लोकलमध्ये अडकलेल्या मुंबईकरांना अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा 'लोकलकाेंडी' सहन करावी लागली. भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी वीजांच्या कडकडांटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नेहमीप्रमाणे सायन, परळ, माहीम, माटुंगा अशा रेल्वे मार्गावरही पाणी तुंबलेच, पण तांत्रिक बिघाडामुळेही मध्य, पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर ते विरार प्रवास पूर्ण करण्यासाठी तर प्रवाशांना साडेतीन तास मोजावे लागले. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून हजेरी लावलेल्या पावसाने रात्री उशिरापर्यंत ठाण मांडली होती. वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला पुन्हा एकदा जलमय करून टाकले. हार्बर रेल्वे मार्गावर विलेपार्ले-सांताक्रूझ दरम्यान ट्रॅकवर झाड पडून अंधेरीपर्यंतची लोकल सेवा विस्कळीत झाली. 



त्यानंतर सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस वसई येथे तांत्रिक कारणामुळे लोकल सेवा ठप्प झाली. तर वांद्रे ते माहीम दरम्यान देखील तांत्रिक बिघाडाचा लोकल वाहतुकीला फटका बसला. नालासोपारा रेल्वे स्थानक वगळता कुठल्याही रेल्वे स्थानकांत म्हणावे त्याप्रमाणात पाणी तुंबले नव्हते, तरीही लोकलची रखडपट्टी झालीच.

दादर रेल्वे स्थानकावरून विरारसाठी निघालेली ९.२६ ची लोकल विरार स्थानकात १ वाजून १० मिनिटांनी पोहोचली. नायगाव येथेच ही लोकल एक ते सव्वा तास थांबून होती. त्यानंतर ही लोकल रखडत रखडत विरारच्या दिशेला निघाली. रेल्वे लोकल उशिराने धावत असल्यामुळे तसेच अनेक गाड्या रद्द केल्यामुळे सर्वच स्थानकांवर गर्दीचा महापूर लोटला. दादर, अंधेरी, बोरीवली, तसेच भाईंदर रेल्वे स्थानकांवर  गर्दी झाल्यामुळे लोकल पकडण्यासाठी एकच झुंबड उडाली. परंतु लोकल पकडल्यानंतरही प्रवाशांना गुदमरत प्रवास करावा लागला. तासभर ट्रेन जागीच खोळंबल्याने उपाशी पोटी असलेल्या प्रवाशांनी नाईलाजाने बसल्याजागीच डुलकी घेणे पसंत केले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा