Advertisement

कोरोना बराही होईल, पण ‘या’ महाभयंकर आजाराचं काय?

कोरोना बराही होईल. पण आपल्यातील त्या महाभयंकर आजारातून आपली सुटका कशी होईल? तो विषाणू तुमची बुद्धी पोखरतो. कसे वाचाल त्याच्यापासून...

कोरोना बराही होईल, पण ‘या’ महाभयंकर आजाराचं काय?
SHARES

कोरोनासारख्या महाभयंकर आजारानं जगभरात थैमान घातलं आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये कोरोना पसरत आहे. पण कोरोनाहून आणखी एक भयंकर आजारानं आपण सगळेच ग्रासलो आहोत. तो देखील मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. या आजारात मेंदू काम करणं बंद होतो. त्या विषाणूच्या हाताचे आपण बाहुले बनतो. हा आजार म्हणजे मेंदूला पोखरणाऱ्या ‘अफवा’... या आजाराचं केंद्र आहे व्हॉट्सअप युनिव्हरसिटी. या आजारावर औषध काय? याचा सामना कसा करायचा? त्यासाठी देवानं (लोकांच्या भाषेत) दिलेली बुद्धी वापरणं हाच एक उपाय. पण ती बुद्धी गहाण टाकल्यासारखं काही जण वागत आहेत.


अफवांचा बाजार गरम

आता हेच बघा ना कोरोनावर उपाय म्हणून गोमूत्र प्या, अंगाला शेण लावा आणि काय तर म्हणे लसूण जवळ ठेवा असे मेसेजेस व्हॉट्सअपवर पसरवले जात आहेत. याचा परिणाम असा की, कोरोना होऊ नये म्हणून त्याचं जास्त सेवन करून लोकं दुसऱ्याच आजाराल निमंत्रण देत आहेत. एखाद्या आजाराची डॉक्टरांसोबत सहनिशा केलीच जात नाही. या अफवांच्या नादात इराणमध्ये ७३ जण टॉक्सिक अल्कोहोल (रसायन) पिऊन मृत पावली. कोरोनामुळे नाही तर कोरोना होऊ नये म्हणून मिळालेल्या चुकिच्या माहितीवर विश्वास ठेऊन त्यांनी आपले प्राण गमावले.


‘ही’ कसली मानसिकता?

तासनतास व्हॉट्सअॅप वापरून वापरून खरं काय? खोटं काय? हे समजण्याची आपली कुवतच संपली आहे का? आता हेच बघा ना एका तरुणानं व्हॉट्सअपवर अमुक भागात गोळीबार झाला असून लवकरच लष्कराला पाचारण करणार अशी अफवा पसरवली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अगदी लहान लहान मुलं देखील पालकांच्या व्हॉट्सअपवर आलेले मेसेज वाचून दिशाभूल होत आहेत. आपले पालकच या अफवांना हवा देत आहेत म्हटल्यावर मुलं देखील दुसरं काय करणार? माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी तरी करा. पडताळणी नाही करता आली तर तो मेसेज तुम्ही पुढे पाठवलाच नाही पाहिजे.


यालाच माणुसकी म्हणायची का?

काही ठिकाणी तर, कोरोनाच्या संशयामुळे कुटुंबियांना वाळीत टाकलं जातंय. त्यांना त्रास दिला जातोय. व्हॉट्सअपवर येणाऱ्या व्हिडिओ, मेसेजेसचा चुकिचा वापर करून त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आता कुठे गेली आपली माणुसकी? मला माहित आहे या आजाराबद्दल सगळयांच्या मनात भिती आहे. प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता आहे. पण व्हॉट्सअपवर येणाऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही चुकिच्या अफवा पसरवून एखाद्याला त्रास नाही देऊ शकत. या आजाराचं संकट आहे म्हणूनच सरकारनं देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पण तुम्ही कारण नसताना गावभर हिंडणार. घोळका करून याचं त्याचं ऐकून अफवा पसरवणार. याला काय अर्थ नाही राव… एवढीच भिती आहे तर गप्पं बसा की घरात.


'हे' रक्षकांचे भक्षक

नुकतीच एक घटना समोर आली ती म्हणजे अमुक एक नर्स एखाद्या हॉस्पीटलमध्ये काम करते म्हणून तिलाही कोरोना झालाय अशा अफवा पसरवल्या जात आहेत. उलट कौतुक केलं पाहिजे समाजात वावरणाऱ्यांच्या जीवाची पर्वा म्हणून स्वत:हून त्यांनी चाचणी केली. रिपोर्ट आले नाहीत. पण सोसायटीत राहणाऱ्या काही लोकांकडून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची अफवा पसरवली जातेय.  लोकं घाबरली असल्याच्या नावाखाली असा ञास दिला जातोय. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह असते तर त्या नर्सला घरी सोडलं असतं का? हा साधा विचार करता येऊ नये. 

ही पहिली घटना नाही. अशा अनेक बातम्या समोर आल्या आहेत. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल यांच्याच सहय्यानं कोरोनावर मात केली जात आहे. पण आज त्यांच्याबद्दलच अफवा पसरवल्या जात आहेत. जिथे आपण गेल्या दोन आठवड्यापासून घरात बसलो आहोत तिकडे डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल हेच देशाच्या नागरिकांची रक्षा करत आहेत.


ते आहेत म्हणून तुम्ही आहात

डॉक्टर, नर्स हे जर गेल्या २ आडवड्याआधीच घरात बसले असते तर? तुम्हाला होणाऱ्या आजारांशी कुणी लढा दिला असता. फक्त कोरोनाच नाही तर साधा ताप, सर्दी, खोकला यावर उपचार कसे झाले असते? कुटुंब फक्त आपलंच नाही तर त्यांचं देखील आहे. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल हे आपला जीव धोक्यात घालून देशाच्या नागरिकांची सेवा करत आहेत. पण आज या क्षेत्रात काम करणारे ज्या परिसरात राहतात त्यांना वाळीत टाकलं जातंय. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय. त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत.

घरात बसून एका ठिकाणाहून अफवा पसरवायला काय जातंय? खरी परीक्षा तर त्यांची आहे जे या आजाराशी खरा लढा देत आहेत. जर आपल्याला त्यांच्या बलिदानाची जराही कदर नसेल तर फक्त घरात बसून टाळ्या आणि थाळ्या वाजवायचं नाटक बंद करा.


समाजासाठी त्यांचं बलिदान

खाजगी दवाखाने चालू ठेवण्याचे आदेश सरकारनं डॉक्टरांना दिले आहेत. सामान्य नागरिकांना त्यांना उद्भवणाऱ्या इतर आजारांवर उपचार घेता यावेत हे या मागचं कारण. त्या डॉक्टरानं त्याच्या सोबत काम करणाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकावा या समाजासाठी?

पण उद्या एखाद्या रुग्णावर उपचार करता करता समजा त्याला कोरोना झाला? किंवा नाही झाला? पण हाच समाज म्हणजे डॉक्टराच्या सोसायटीत राहणारी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर संशय घेतील. त्यांच्याबद्दल अफवा पसरवतील. दुसऱ्यांच्या आलेल्या ऑडियो आणि व्हिडिओ क्लिप वापरून त्याला कोरोना झालाय असा कांगावा करतील. मग अशावेळी या नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनी का आपला जीव धोक्यात घालावा?


अफवा पसरवू नका

एखादा आजार झाल्यावर आपण खबरदारी म्हणजेच प्रीकॉशन घ्यायची असते हे मान्य आहे. सतर्क राहणं देखील गरजेचं. पण तुम्ही एखाद्याबद्दल अफवा पसरवणं, त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना त्रास देणं, चुकिची माहिती पसरवणं याला खबरदारी घेणं म्हणत नाहीत.

जर तुमच्या परिसरात चिंतेचं वातावरण असेल तर त्यावर पालिका आणि पोलीस काय ती कारवाई करतील. त्यामुळे कृपया करून अफवा पसरवणं बंद करा. तुम्हाला एवढीच भिती वाटत असेल तर घराच्या बाहेर पडू नका आणि कुणाला बाहेरून आत येऊ देऊ नका. फक्त एवढंच करणं तुमच्या हातात आहे. उगाच अफवा पसरवून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या अडचणीत वाढ करू नका. नाहीतर तुमच्यावर कारवाई अटळ आहे.


नाहीतर होईल कारवाई

अफवा पसरवणाऱ्यांची तक्रार देखील करता येऊ शकते. तुम्हाला असं कुणी आढळल्यास किंवा तुमच्यासोबत असं कुणी करत असल्यास त्याची तक्रार तुम्ही पोलीसांकडे करू शकता. अफवा कशाप्रकारे पसरवली जात याची नोंद फक्त ठेवा. जसं की व्हॉट्सअपवर येत असेल तर स्क्रिन शॉट काढा. कॉल करून त्रास दिला जात असेल तर कॉल रेकॉर्ड करा. घरात येऊन धमकावलं जात असेल तर व्हिडिओ काढा. पण घाबरून हताश होऊ नका. अशा विकृतांना रोखणं आवश्यक आहे.


काळजी घ्या... घरात रहा, सेफ रहा आणि अफवांपासून दूर रहा...


कव्हर फोटो सौजन्य



हेही वाचा

लष्कर दाखल झाल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला अटक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा