Advertisement

'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी'; पुर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यांच्या गेटवर लागणार भित्तीपत्रक

या भित्तीपत्रकाचं पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी'; पुर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यांच्या गेटवर लागणार भित्तीपत्रक
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाला आळा महापालिका व राज्य सरकार दिवसेंदिवस अनेक उपाययोजना करत आहे. शिवाय, लसीकरण हा जालीम उपाय असल्यानं मोठ्याप्रमाणात लसीकरणही केलं जातंय. सद्यस्थितीत लसीकरणावर भर दिला जात असून, जा नागरिकांचं लसीकरण झालं आहे, त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा सुरू झाल्या आहेत. अशातच आता मुंबईतील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा संस्थांच्या दर्शनीभागी 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' या संदेशासह आकर्षक आणि अभिमानास्पद ढाल असणारी भित्तीपत्रकं लावण्यात येणार आहेत.

या भित्तीपत्रकाचं पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ही भित्तीपत्रके महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील ज्या सहकारी गृहरचना संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा सोसायट्यांच्या दर्शनीभागी लावण्याचे आदेश यापूर्वीच सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.

या भित्तीपत्रकांवर संबंधित सहकारी संस्थेचे नाव नमूद करून त्यावर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी असणे व महापालिकेची मुद्रा असणे बंधनकारक आहे. याच 'पोस्टर'वर एक 'क्यू आर कोड' असून तो आपल्या भ्रमणध्वनीच्या सहाय्याने स्कॅन केल्यावर भ्रमणध्वनीमध्ये https://stopcoronavirus.mcgm.gov.in/vaccination हे संकेतस्थळ उघडले जाणार आहे.

मुंबईतील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे, याकरिता सर्वस्तरीय विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा भाग म्हणून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होण्याकरिता 'माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी' असा संदेश असलेली मराठी व इंग्रजी भाषेतील भित्तीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत.

या लिंकवर गृहरचना संस्था ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसरातील लसीकरण केंद्रांची  माहिती  उपलब्ध असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा