Advertisement

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षांचे निधन

वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षांचे निधन
SHARES

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अध्यात्माला सेवाकार्याची जोड देऊन मानवकल्याणाचा आदर्श निर्माण करणारं कृतीशील व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

तसंच ते पुढे म्हणाले की, गणपती ट्रस्टच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय उपचार, रुग्णसेवा, जलसंवर्धन, निसर्गसंवर्धन, ग्रामविकास, आपत्तीनिवारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी सेवाकार्याचा डोंगर उभा केलं. अशोकराव गोडसे पुण्याचं सांस्कृतिक वैभव होतं. त्यांचं निधन राज्याच्या अध्यात्मिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अशोकराव गोडसे यांनी वडील तात्यासाहेबांचा सेवाकार्याचा वारसा पुढे चालवला. गेली अनेक दशकं पुण्याच्या अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सक्रीय योगदान दिलं.

सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यापासून सुरु होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासात ते पुणे शहराच्या वाटचालीतील अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. गणपती ट्रस्टच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर उपचार करुन त्यांना जीवनदान दिलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा