तिवरांच्या रक्षणासाठी लवकरच संरक्षण भिंती

  Mumbai
  तिवरांच्या रक्षणासाठी लवकरच संरक्षण भिंती
  मुंबई  -  

  समुद्र, खाडीलगतच्या तिवरांचे अतिक्रमणांपासून आणि कत्तलीपासून रक्षण करण्यासाठी कांदळवन कक्षाने कांदळवन हद्दीच्या बाहेर संरक्षण भिंती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वप्रथम मुंबईतील पाच ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कामासाठी येत्या महिन्याभरात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती एन. वासुदेवन, मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबई यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. मुंबईतील पाच ठिकाणी संरक्षण भिंती बांधून झाल्यानंतर पुढे जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसे इतरत्र ठिकाणी भिंतींचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

  मुंबईत अंदाजे 5,800 हेक्टर जागेवर तिवरांचे जंगल आहे. मात्र विकासाच्या नावावर एकीकडे तिवरांचे जंगल हळूहळू नष्ट केले जात आहे, तर दुसरीकडे तिवरांची कत्तल करत तेथे भराव टाकत झोपड्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे तिवरांचे जंगल नष्ट होत असून, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यावर उपाय म्हणून कांदळवन कक्षाच्या हद्दीच्या बाहेर संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय कांदळवन कक्ष, मुंबईने घेतला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर तिवरांच्या लगत वा तिवरांच्या जागेवरील अतिक्रमणे कांदळवन कक्षाकडून हटवण्यात आली आहे. कफ परेडमधील 1300 झोपड्या मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात हटवण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिथे जिथे अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत तिथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून प्राधान्यक्रमाने तिथे संरक्षण भिंती बांधण्यात येणार असल्याची माहिती कांदळवन कक्षातील वरिष्ठ अधिकारी मकरंद घोटके यांनी दिली आहे.

  कफ परेडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरसह मानखुर्द, विक्रोळी, कांजुरमार्ग आणि चारकोप अशा पाच ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे 6 कोटींचा निधी आवश्यक आहे. महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन विभागाकडून हा निधी कांदळवन कक्षाला उपलब्ध होणार आहे. त्यानुसार या भिंतीचे काम सुरू करण्यासाठी महिन्याभरात निविदा काढण्यात येणार आहे. तर प्री फॅब पद्धतीने संरक्षण भिंती बांधण्यात येणार असल्याने प्री फॅबचा अनुभव असणाऱ्या कंपन्यांचा निविदेत सहभागी होता येणार आहे. दरम्यान साधारणत: 10 फुट उंचीच्या या भिंती असणार असून, सांडपाणी वाहण्याची व्यवस्थाही यात करण्यात येणार आहे. तर कुठे 2 किमी तर कुठे 500 मीटरच्या लांबीच्या या भिंती असणार आहेत.

  संरक्षण भिंतीमुळे तिवरांचे नुकसान नाही

  संरक्षण भिंतीमुळे पाणी अडले जाईल आणि त्याचा फटका तिवरांना बसेल असे म्हणत पर्यावरण तज्ज्ञांनी संरक्षण भिंतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. एन. वासुदेवन यांनी मात्र या भिंतीमुळे कोणत्याही प्रकारे तिवरांचे नुकसान होणार नाही वा पाणी अडले जाणार नाही. त्यादृष्टीनेच भिंतींची रचना करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.


  हेही पहा - 

  मेट्रोचा मोर्चा आता मुंबईतल्या तिवरांकडे


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.