Advertisement

मुंबईकरांसाठी अंधेरीत मशीनमध्ये कपडे धुण्याची 'सुविधा’

परदेशाप्रमाणं आता मुंबईकरांनाही सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये कपडे धुता येणार आहे.

मुंबईकरांसाठी अंधेरीत मशीनमध्ये कपडे धुण्याची 'सुविधा’
SHARES

परदेशाप्रमाणं आता मुंबईकरांनाही सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये कपडे धुता येणार आहे. यासाठी महापालिकेनं अंधेरीमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेनं खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं 'सुविधा' हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला 'सुविधा' असं नाव देण्यात आलं असून, या सुविधेसाठी दुमजली केंद्र सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये कपडे धुण्यासोबतचं आंघोळ आणि शौचालयाचीही सुविधा देण्यात आली आहे.

सामाजिक उत्तरदायित्व निधी

हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड आणि एचएसबीसी बॅंक यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या 'सुविधा' केंद्रातून लोकांना कपडे धुण्याच्या मशीनमध्ये आपले कपडे धुऊन, सुकवून नेता येणार आहे. अवघ्या ५५ रुपयांत एक बादली म्हणजेच साधारण १२ कपडे धुण्याची सोय, १ रुपयात एक लिटर पिण्याचं पाणी, कमोडची सोय, आंघोळीची सोय अशा सुविधा या केंद्रात देण्यात आल्या आहेत.

अनोखं सुविधा केंद्र

धुण्याचे कपडे घेऊन जायचे आणि सार्वजनिक मशीनमध्ये स्वत:च धुऊन सुकवून आणायचे, अशी सुविधा मुंबईतही उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या के (पूर्व) विभागानं अंधेरी पूर्वेला आंबेवाडीत हे अनोखं सुविधा केंद्र सुरू केलं आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे.

असं आहे 'सुविधा'

या सुविधा केंद्रात बेसीनची सोय, साबण, आंघोळीसाठी २ शॉवरसहित न्हाणी घरं, ४० शौचालयं त्यापैकी १८ महिलांसाठी तर १८ पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी ३ व अपंगासाठी १ शौचालय अशी सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन बदलण्याची सोय आहे. तसंच, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा २४ तास पुरवठा करणारे मशीनही यात असून १ रुपयात एक लिटर पाणी तर १५ रुपयात २० लीटर पाणी मिळू शकणार आहे.

कपडे धुण्याच्या ८ मशीन या केंद्रात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बादली, साबण पावडर याचाही पुरवठा इथं केला जातो. ५५ रुपयात एक बादली म्हणजेच साधारण बारा कपडे धुता येणार आहेत. हात धुण्यासाठी, दात घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी इथं शौचालयासाठी वापरलं जातं आहे.



हेही वाचा -

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांची निवड

मुंबईमध्ये घरात चक्क गांजाची लागवड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा