Advertisement

२८ जानेवारीला मुंबईसह राज्यभर पल्स पोलिओ विशेष मोहीम


२८ जानेवारीला मुंबईसह राज्यभर पल्स पोलिओ विशेष मोहीम
SHARES

पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्यात २८ जानेवारी आणि ११ मार्चला पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील १ कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात ८५ हजार बूथ उभारण्यात येणार आहेत. येत्या रविवारी बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे.

बुधवारी झालेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत लसीकरण मोहिमेसाठी नियोजन आणि संबंधित विभागांनी करायच्या कार्यवाहीचा आढावा आरोग्य विभागाचे प्रभारी सचिव संजय देशमुख यांनी घेतला. यावेळी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीव कुमार उपस्थित होते.


नियोजन काय?

पोलिओ निर्मूलन विशेष मोहीम १९९५ पासून सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबवली जाते. पोलिओचं समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर्षी २८ जानेवारीला ही मोहीम घेण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढील ५ दिवस जवळपास २ कोटी ९० लाख ९० हजार घरांना भेटी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहे.


गेल्या वर्षीची आकडेवारी

यावर्षी १ कोटी २१ लाख २९ हजार ३५० बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी जानेवारीत झालेल्या विशेष मोहिमेत १०२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत १ कोटी २३ लाख ५१ हजार ४६४ बालकांना डोस पाजण्यात आला. तर, एप्रिलमध्ये ९८ टक्के मुलांना डोस देण्यात आला होता.

रविवारी होणाऱ्या या मोहिमेकरीता आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आलं आहे. शालेय शिक्षण, महिला व बालविकास, परिवहन, नगरविकास, ग्रामविकास, ऊर्जा विभाग, रेल्वे, रोटरी क्लब यांच्या सहकार्याने लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या वेळी अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सादरीकरण केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा