Advertisement

जबाबदार कोण? पाऊस, रेल्वे प्रशासन की प्रवासी?


जबाबदार कोण? पाऊस, रेल्वे प्रशासन की प्रवासी?
SHARES

वेळ सकाळी साडे दहा...स्थळ मुंबईतील एलफिन्स्टन...नेहमीप्रमाणे एलफिन्स्टनच्या अरुंद ब्रिजवर चाकरमान्यांची लगबग. त्यात मुसळधार पाऊस. पावसापासून बचाव म्हणून चाकरमानी ब्रिजवरच थांबले. तेवढ्यात अचानक अफवा पसरायला सुरुवाच झाली आणि एकच गोंधळ सुुरु झाला. एक जण ओरडला पूल पडणार आहे, दुसरा ओरडला शॉर्ट सर्किट झाले आहे, अशी अफवाच वाऱ्यासारख्या पसरल्या. पुलावर प्रचंड गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत २२ मुंबईकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ३३ चाकरमानी जखमी झाले.



दुर्घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण? जर ही परिस्थिती योग्यवेळी हाताळली असती तर ही दुर्घटना टळली असती का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांनी काय करायला हवे होते? 

- मिलिंद वैद्य, प्रकल्प संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग


'क्राऊड मॅनेजमेंट' अंतर्गत रेल्वे प्रशासनाने काय करायला हवे होते?


  • पाऊस पडत असल्याने चाकरमानी ब्रिज आणि जिन्यांवरच उभे राहिले. त्यामुळे तिथे प्रचंड गर्दी झाली. रेल्वे प्रशासनाने याबाबत अनाऊन्समेंट करणे आवश्यक होते
  • रेल्वे प्रशासनाने पोलीस किंवा सेक्युरिटीची मदत घेऊन ब्रिजवर जमलेल्या गर्दीला मार्गस्थ करायला हवे होते
  • अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाकडून ब्रिज खाली करण्याच्या सूचना देणे आवश्यक होते
  • ब्रिजवर जागा नसल्याचे कळताच स्टेशनमास्तरांनी अशावेळी प्लॅटफॉर्मवरच चाकरमान्यांना थांबवायला हवे होते
  • ब्रिज अरुंद असल्याने गर्दी वाढली. ब्रिजवरील गर्दी पांगवली असती, तर ही दुर्घटना टळली असती
  • जेव्हा एलफिन्स्टनचा ब्रिज बांधला, तेव्हा लोकसंख्या एवढी नव्हती. पण आता लोकसंख्येनुसार ब्रिजचे रुंदीकरण आणि संख्या वाढवणे तितकेच गरजेचे होते. पण तसे झाले नाही



प्रवाशांनी काय करायला हवे होते?


  • रेल्वे प्रशासन जबाबदार असले, तरी अशा परिस्थितीत लोकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे
  • कुणीतरी अफवा पसरवली आणि होत्याचे नव्हते झाले. जर त्याने अफवा पसरवली नसती, तर ही चेंगराचेंगरी झालीच नसती
  • शिवाय प्रवाशांनीही अफवांवर लागलीच विश्वास न ठेवता आधी खातरजमा करणे आवश्यक होते
  • ब्रिजवर गर्दी होतेय हे पाहून चाकरमान्यांनी ब्रिजवर न जाता प्लॅटफॉर्मवर थांबायला हवे होते
  • पावसात भिजलो तरी चालेल, पण अशा परिस्थितीत ब्रिजवर न थांबता चाकरमान्यांनी मार्गस्थ व्हायला हवे होते
  • अशा परिस्थितीत लोकं पॅनिक झाले की विचार न करता पळत सुटतात. आपला जीव वाचवण्यासाठी मधे येणाऱ्या प्रत्येकाला अक्षरश: धक्काबुक्की किंवा तुडवले जाते
  • अशी परिस्थिती उद्भवल्यास लोकांनी एकमेकांना रस्ता करून देणे, आधी लहान मुलांना आणि ज्येष्ठांना बाहेर काढणे, कुणी पडले असल्यास त्यांना उचलणे, असा समजुतदारपणा दाखवणे गरजेचे आहे


काळजी न घेतल्यास काय होऊ शकते?


पहिली घटना - २९ ऑगस्टला पडलेल्या पावसात मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पण असे असतानाही कित्येकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर आणल्या होत्या. त्यापैकी अनेकांनी गाडी तिकडेच सोडून दिली होती. पण काही जण गाडीतच थांबले. त्यामुळे गाडीतच जीव गुदमरल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले. 


दुसरी घटना - काही वर्षांपूर्वी रेल्वेत एक घटना घडली होती. रेल्वेच्या महिला डब्यातून धूर येत होता. यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. महिलांनी एकमेकींना धक्का द्यायला सुरुवात केली. धक्काबुक्कीत दारात उभ्या असलेल्या महिलांवर भार पडला आणि यातच ६-७ महिला दारातून बाहेर पडल्या. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लोकल खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला.


अशा परिस्थितीमध्ये गोंधळ होणं साहजिक आहे. स्वाभाविकही आहे. पण त्याचवेळी किमान थोडं प्रसंगावधान राखून काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कित्येकांचे जीव वाचू शकतात.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा