Advertisement

मुंबईकरांपुढील धोका टळला - भरती आणि मुसळधार पावसाचे गणित चुकले


मुंबईकरांपुढील धोका टळला - भरती आणि मुसळधार पावसाचे गणित चुकले
SHARES

दुपारी १२ वाजता समुद्राला मोठ्या लाटांची भरती येणार असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भरतीच्या जोडीला पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईकरांची खैर नव्हती, परंतु पावसाचा जोर ओसरल्यामुळे भरतीचाही तितकासा प्रभाव जाणवला नाही आणि मुंबईकरांपुढील मोठा धोका टळला.

दरम्यान, बुधवारी कुलाबा भागात 75.4 मि.मी आणि सांताक्रुझ येथे 61.0 मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. तसेच, गुरुवारी दुपारी 12.35 ला भरती असून 4.46 मीटर उंचीच्या लाटा उसळतील आणि मध्यमसरी कोसळतील, असे भाकित मुंबई वेधशाळेने केले आहे. 

बुधवारी सकाळी जोर धरलेल्या पावसाने दुपारपर्यंत आपला मूड बदलला. पाऊस सलग पडत असला, तरी संततधार असल्याने दुपारी भरती असूनही कुठेही पाणी तुंबले नाही.

बुधवारी दुपारी १२.०३ वाजता समुद्रात ४.५४ मीटर उंचीच्या लाटा उसळल्यास मुंबईत अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता होती. पण या दरम्यान फार जोरात पाऊस न पडल्याने हौशी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस वर जाऊन लाटांमध्ये भिजण्याचा आनंद लुटला. 


तिन्ही मार्गांवरील रेल्वेसेवा धिम्या गतीनेच

मंगळवारच्या पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या बहुतेक नोकरदारांनी कामावर जाणे टाळल्याने बुधवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर तुरळकच प्रवासी दिसत हाेते. मात्र या तिन्ही मार्गांवरील सेवा धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसले.



बेस्टच्या ३१९३ बस रस्त्यांवर

बुधवारी सकाळपर्यंत अनेक भागांमधील पाण्याचा निचरा झालेला नसला, तरी बेस्ट्च्या एकूण ३४०१ बसेसपैकी ३,१९३ बस रस्त्यावर धावत होत्या. कर्मचाऱ्यांअभावी १७५ बस रस्त्यावर उतरल्या नाहीत. तर दुरुस्ती व डागडुजीसाठी ३४ बस आगारात होत्या.



धरणातील पाण्याची पातळी वाढली

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व धरणांमध्ये १४ लाख २८ हजार दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. तानसा तलाव, मोडकसागर, तुळसी तसेच विहार हे ४ तलाव भरुन वाहू लागले असून अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा धरणही जवळपास भरले आहे. भातसा धरणानेही पाण्याची परमोच्च पातळी गाठली आहे. मोडकसागर (१३५ मि.मी), तानसा (८३ मि.मी), विहार (२०० मि.मीश), तुळसी (२४८ मि.मी),अप्पर वैतरणा (११० मि.मी), भातसा (९५ मि.मी), मध्य वैतरणा (९० मि.मी) एवढ्या पावसाची नोंद मंगळवारी ते बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत या एका दिवसात झाली.



१६८ ठिकाणी झाडांची पडझड

मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटून त्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यानंतरही मुसळधार पावसात १६८ झाडे उन्मळून पडली आहेत. या झाडांमुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले आहेत. बुधवार दुपारपर्यंत शहरात ६० झाडे पडली. तर पूर्व उपनगरात ३७ आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक ७१ झाडे उन्मळून पडली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा