Advertisement

दादरकर म्हणताहेत, फेरीवाला हटाव, पण राडा नको!

मनसेच्या आंदोलनानंतर दादरमधील रेल्वे स्थानक परीसर मोकळा श्वास घेऊ लागला असून महापालिकेने त्यांना १५० मीटरची हद्दही आखून दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासी, दादरमधील रहिवासी समाधानी असले, तरी दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या उपजिवीकेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

दादरकर म्हणताहेत, फेरीवाला हटाव, पण राडा नको!
SHARES

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून मनसे आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद भलताच चिघळला आहे. तोडाफोडीवरून सुरू झालेलं प्रकरण आता हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. मनसेच्या आंदोलनानंतर दादरमधील रेल्वे स्थानक परीसर मोकळा श्वास घेऊ लागला असून महापालिकेने त्यांना १५० मीटरची हद्दही आखून दिली आहे. यामुळे रेल्वे प्रवासी, दादरमधील रहिवासी समाधानी असले, तरी दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या उपजिवीकेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणावर दादरकरांना काय वाटतं. हे जाणून घेण्याचा 'मुंबई लाइव्ह'ने केलेला प्रयत्न.


फेरीवाल्यांना वेळीच आवर घालणं आवश्यक होतं. त्यांचा पसारा वाढल्यानंतर सरकारला आणि एकूण सिस्टिमला जाग आली आहे. फेरीवाले हटविल्यामुळे रस्त्यांची लांबी-रुंदी मुंबईकरांना खऱ्या अर्थाने माहीत झाली आहे. सोबतच सरकारने फेरीवाल्यांच्या उपजिवीकेसाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी.

- प्रियंका कुंभार, रहिवासी, दादर


फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कोणत्याही मोर्चा किंवा आंदोलनाची गरज असल्याचं मला वाटत नाही. मुंबईकरांना मोकळे रस्ते हवेत, पण हाणामारी नको. कोणत्याही मोर्चाचा गोंधळामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला फायदा होत नाही उलट सर्वसामान्य आशा मोर्चामुळे त्रस्त होतात. मोर्चामुळे दुकानदारांना दुकाने बंद करावी लागतात. त्यांना कोणताही पक्ष आर्थिक नुकसानभरपाई देणार नाही. त्यामुळे फुटपाथ मोकळे हवेत मात्र आंदोलन नकोत.

- जय शृंगारपुरे, रहिवासी, दादर
काँग्रेस किंवा मनसेच्या भूमिकेपेक्षा सर्वसामान्यांना काय हवंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वसामान्यांना फुटपाथही मोकळे हवेत आणि स्वस्त दारातल्या वस्तू देखील हव्यात. राजकीय पक्षानी नसत्या गोष्टींचं राजकारण करण्यापेक्षा सर्वसामान्यांना काय हवं याचा अभ्यास करणं आवश्यक आहे.

- निनाद आवळे, रहिवासी, दादर


राजकीय नेते फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान करत आहेत. कुणाच्या मृत्यूनंतर मोर्चे निघून प्रकरण मारहाणीपर्यंत जावं ही बाब नक्कीच लज्जास्पद आहे. फेरीवाल्यांना पाठिंबा देणारा काँग्रेस मोकळ्या फूटपाथविषयी बोलत नाही आणि फूटपाथ मोकळे करणारे मनसैनिक स्वस्त दरांत मिळणाऱ्या वस्तूंविषयी बोलत नाही. दोन्ही पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. काही फेरीवाले महाराष्ट्रातले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने योजना करावी.

- अनेरी कदम, रहिवासी, दादर


मनसेच्या संताप मोर्चानंतर रिकामे झालेले फुटपाथ मी अनेक वर्षांपासून दादरमध्ये राहत असून पाहिले नव्हते. ते आता पाहायला मिळत आहेत. चालणं सोइचं झालं आहे. संजय निरूपम यांना एकदा दादरच्या गर्दीत सोडावं मग त्यांना कळेल फेरीवाल्यांचं अतिक्रमण आणि त्रास काय असतो.

- अमित गोडबोले, रहिवासी, दादर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा