पश्चिम उपनगरातील दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ३६ ठिकाणी जलवाहिन्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. मुंबईकरांना शुद्ध आणि नियमितपणे पाणीपुरवठा केला जात असताना काही ठिकाणी दूषित आणि अनियिमित पाणीपुरवठय़ाच्या तक्रारीही करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने आवश्यक त्या प्रभागांमध्ये जलवाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
याकामामुळं पाणीपुरवठ्यामध्येही सुधारणा होणार असून, महापालिका यासाठी ४ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आदी ठिकाणच्या ३६ भागांमध्ये हे काम करणार आहे.
पालिकेने या कामासाठी ५ कोटी २५ लाख रुपयांचा अंदाजित खर्च मांडला होता. त्यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये सर्वात कमी म्हणजे ३० टक्के दराच्या निविदेची निवड झाली आहे.
त्यामुळे हे काम कर आदी मिळून ४ कोटी ६७ लाख रुपयांत केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.