Advertisement

नैसर्गिक विधीसाठी जायचं कुठं? प्रेमनगरच्या रहिवाशांचं शौचालयासाठी 'टमरेल' आंदोलन


नैसर्गिक विधीसाठी जायचं कुठं? प्रेमनगरच्या रहिवाशांचं शौचालयासाठी 'टमरेल' आंदोलन
SHARES

एका बाजूला केंद्र सरकारच्या 'स्वच्छ भारत' योजनेअंतर्गत मुंबई महापालिका प्रत्येक नागरिकाला प्रात:विधीसाठी शौचालयात जाण्याचा आग्रह करत असताना. दुसरीकडे स्वत:च्या मोहिमेला हरताळ फासत अंधेरीतील सार्वजनिक शौचालय पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात अंधेरीच्या इर्ला, प्रेमनगर, एस. व्ही. रोड येथील रहिवाशांनी महापालिका परिसरात 'टमरेल' आंदोलन केलं. या सोसायटीतील शौचालय अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे शौचालय पाडण्याची नोटीस शौचालयाच्या बाहेर लावली आहे.


५ पैकी ४ शौचालय पाडणार

येथील रहिवासी गेल्या २० वर्षांपासून या शौचालयांचा वापर करत आहेत. पण, अचानक शौचालय पाडण्याची नोटीस बजावल्यामुळे नागरीक आश्चर्यचकीत झाले. या सोसायटीत स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत ५ शौचालय बांधण्यात आले होते. त्यापैकी, ४ शौचालय ४८ तासांत तोडण्याची नोटीस २५ ऑक्टोबरला महापालिकेने लावली. महापालिकेने शौचालय तोडल्यास नैसर्गिक विधीसाठी कुठे जायचं? असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. महापालिकेकडून दाद मिळत नसल्याने अखेर 'वॉचडॉग फाऊंडेशन'च्या सहकार्याने टमरेल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी स्थानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून हातात टमरेल घेत निषेध केला. 



बिल्डरचा डाव?

येथील झोपडपट्टीमध्ये मागील २० वर्षांपासून 'सिंगतीया कन्स्ट्रक्शन' या बिल्डरमार्फत 'एसआरए' योजना राबविली जात आहे. पण, अजून एक वीटही रचण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या बिल्डर आणि दलालांच्या सांगण्यावरुन शौचालय तोडण्यात येत असल्याचं तिथल्या स्थानिकांनी सांगितलं आहे. 




महापालिकेकडून या झोपडपट्टीतील शौचालयांना अनधिकृत ठरवून तोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. या झोपडपट्टीत १६२० घरांचा 'एसआरए' प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाला फक्त २०० जणांची सहमती आहे. शिवाय, त्यांनी त्या पर्यायी जागाही करुन दिलेली नाही. त्यामुळे 'वॉचडॉग फाउंडेशन'ने सहाकार्य करायचं ठरवत महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन केलं. 

-निकोलस अल्मेडा, वॉचडॉग फाउंडेशन


महापालिकेने ही नोटीस मागे घेतली नाही, तर आम्ही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या घरासमोरही आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं निकोलस अल्मेडा यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा