Advertisement

टाॅवरमधील आगींची जबाबदारी रहिवाशांचीच


टाॅवरमधील आगींची जबाबदारी रहिवाशांचीच
SHARES

प्रभादेवीतील ब्यू माँड या इमारतीला बुधवारी लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील उत्तुंग इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबईतील ४५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना राबवणं ही रहिवाशांची जबाबदारी असून दर सहा महिन्यांनी अागीच्या उपकरणांसह उपाययोजनांचं ऑडीट करणंही बंधनकारक असल्याचं अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलं अाहे. परंतू अशा इमारतींमधील अाग विझवणं हे अग्निशमन दलाचं बंधनकारक कर्तव्य असल्याने अशी सेवा अग्निशमनकडून दिली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.


दुघर्टनांचं विवरण सादर 

मुंबईतील आगीच्या दुघर्टनांची माहिती देणारं विवरण गुरूवारी स्थायी समितीपुढे मंजुरीला आलं. यावेळी काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी ब्यू माँड इमारतीच्या अागीची दुघर्टना आणि त्याठिकाणी लॅडरसह अग्निशमन यंत्रणा कमी पडल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. आपल्याकडे ३० मजल्यांवर कोणतीही यंत्रणा नाही.  मग आग प्रतिबंधक कायद्याचा अवलंब का केला जात नाही, असा सवाल झकेरिया यांनी केला.


अग्निशमनची एनओसी का ?

उत्तुंग इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना राखण्याची जबाबदारी जर रहिवाशांची असेल तर या इमारतींना अग्निशमन दलाच्यावतीनं एनओसी का दिली जाते. एनओसी देणं बंद करा, असं भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी बजावलं. या उत्तुंग इमारतींमध्ये राहणारे मालमत्ता कर भरत नाहीत का असा सवाल करत यापुढं उत्तुंग इमारतींसाठी उपकरण आणि यंत्रसामग्री खरेदीचे प्रस्ताव आल्यास ते फेटाळले जातील, असंही त्यांनी म्हटलं. 


इमारतींचे पुन्हा परिक्षण करावे

सिंगापूर, दुबईमध्ये उत्तुंग इमारती आहे. त्याप्रमाणे प्रत्येक इमारतींसाठी आग प्रतिबंधक यंत्रणा आणि उपकरणांच्या वापराची कार्यपध्दती निश्चित करण्याची मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. मुंबईतील सर्व उत्तुंग इमारतींचे पुन्हा एकदा अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिक्षण केलं जावं, अशी सूचना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी केली.


ओसी कार्यालयात बसून

इमारतीच्या बांधकामांसाठी अग्निशमन दलाची दोन वेळा एनओसी घेतली जाते. प्रभादेवीतील त्या इमारतीच्या आवारात वाहन लावण्यास अडचण जाईल, असं सांगितलं जातं. तर मग या इमारतीला एनओसी कशी दिली, असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. त्यामुळे ही ओसी कार्यालयात बसून तरी दिली असेल किंवा ही बाब लक्षात येऊनही त्याकडं दुर्लक्ष केले असावे, असा संशय राऊत यांनी व्यक्त केला. सिंधिया व जीपीओसमोरील आगीच्या दुघर्टनेत वापरण्यात आलेल्या वाहनाला ट्रॉलीच नसल्याचा आरोप सानप यांनी केला.




ब्यू माँडच्या आगीची चौकशी प्रमुख अग्निशमन अधिकारी करत अाहेत.  या इमारतींमध्ये कोणते बदल करण्यात आले होते किंवा कसे यांची सर्वंकष चौकशी केली जाईल. जर यात त्रुटी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. -  डॉ. संजय मुखर्जी,अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका



हेही वाचा -

मुंबईकरांचं पाणी ५१ पैशांनी महागलं!

विद्यापीठातील शिक्षकांना अाता पीएचडी बंधनकारक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा