Advertisement

हातात पाटी देऊनही, 'त्या' रस्त्याचे काम अर्धवटच!


हातात पाटी देऊनही, 'त्या' रस्त्याचे काम अर्धवटच!
SHARES

दादरमधील ज्या रस्त्यांवरील खड्डयांमुळे मनसेच्या नगरसेवकांनी प्रमुख रस्ते अभियंता दराडे यांच्या हाती पाटी देऊन त्यांना खड्डयांमध्ये उभे केले आणि याप्रकरणी मनसेच्या ज्या दोन नगरसेवकांना तुरुंगात जावे लागले, त्या न. चिं. केळकर मार्गाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु प्लाझा सिनेमा आणि शिवाजी मंदिरसमोरील या रस्त्यांवरील डांबरीकरणाचे काम अर्धवट सोडूनच कंत्राटदार निघून गेला आहे. त्यामुळे ज्या रस्त्यावरून महापालिकेत रामायण घडले, त्याच रस्त्याबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसेल, तर इतर रस्त्यांची काय स्थिती असेल? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्ग अर्थात एन. सी. केळकर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता बनवण्यात यावा किंवा हे खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडे यांनी प्रशासनाकडे केली होती. परंतु याची दखल प्रशासनाकडून घेतली न गेल्यामुळे संदीप देशपांडे, संतोष धुरी आदींनी अखेर रस्ते प्रमुख अभियंता संजय दराडे यांना सिटी मॉलसमोरील या रस्त्यावरील खड्डयात हाती पाटी देऊन उभे केले. या पाटीवर ‘या खड्डयाला मी जबाबदार आहे’, असे लिहिले होते. या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अवमानकारक वागणूक दिल्याप्रकरणी महापालिकेने याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी देशपांडे आणि धुरी यांना अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणी या दोघांनी तुरुंगवास देखील भोगला होता. 

या प्रकरणानंतर न. चिं. केळकर मार्गाचे काम मार्च-एप्रिल महिन्यात हाती घेऊन मेमध्ये पूर्ण करण्यात आले. मुंबईतील सर्वच रस्त्यांची कामे ही 3 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश होते. परंतु 10 जून उजाडला तरी न. चिं. केळकर मार्गावरील शिवाजी मंदिरासमोरील काही भागाचे काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाचे काम चांगल्या प्रकारे करूनही केवळ काही अंशी न केलेल्या या कामामुळे पावसाचे पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. तर प्लाझा सिनेमासमोर माहिमच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही अर्धवट सोडून दिले आहे.


हेही वाचा  - 

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता


मुळात हे काम पूर्ण होऊन 10 ते 15 दिवस उलटून गेले आहेत. पण या अर्धवट रस्त्याच्या कामाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे हे काम पूर्ण करून घेण्यात ते अपयशी ठरत आहेत. विशेष म्हणजे हे काम करणारा कंत्राटदार हा काळ्या यादीतील आहे. त्यांना दिलेली कामे प्रशासनाने त्यांना पूर्ण करून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे एरवी या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले असले, तरी अर्धवट ठेवलेल्या या कामामुळे पुन्हा यावरून रामायण घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाजी मंदिरसमोरील वृत्तपत्र विक्रेत्याने याबाबत नाराजी व्यक्त केली. हे काम अर्धवट असल्यामुळे याठिकाणी रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पाणी तुंबत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा