SHARE

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या दहिसर तालुका विभागाने गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एका वेगळ्या मार्गाने साजरी करण्याचे ठरवत एका बिबट्यालाच दत्तक घेतलं आहे. येथील तालुका अध्यक्षांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यासांठी दत्तक योजनेअंतर्गत एका बिबट्याच्या पालनपोषणाचा खर्च उचलण्याचे ठरवलं आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचा खर्च भागविण्यासाठी तसेच त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी हस्तांतरीत करण्यासाठी उद्यान प्रशासनानं दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कुठलीही व्यक्ती उद्यानातील प्राण्यांचा वर्षभराच्या पालनपोषणाचा खर्च उचलू शकते.

या योजनेच्या अंतर्गत आरपीआयचे दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एका बिबट्याचा वर्षभराचा पालनपोषणाचा खर्च उचलला आहे. यासाठी त्यांनी 1.20 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडे दिला आहे. यासंदर्भात 15 मे रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कार्यक्रम ठेवण्यात आला असून तेथे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यातर्फे यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या