उपजिल्हाधिकारी स्वाती कारलेंच्या निलंबनाची मागणी

 Collector Office
उपजिल्हाधिकारी स्वाती कारलेंच्या निलंबनाची मागणी
Collector Office, Mumbai  -  

वांद्रे - झोपु प्राधिकरणातील एका सुनावणी वकिलांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या उपजिल्हाधिकारी स्वाती कारले यांचे त्वरीत निलंबन करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मारहाण झालेले वकील अॅड. आनंद सांगवीकर यांनी केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

27 फेब्रुवारीला एका सुनावणीदरम्यान अर्जकर्त्याचे वकील सांगवीकर यांना कारले यांनी एका कागदपत्रावर सही करण्यास सांगितले. पण त्या कागदावर आपले नाव नसल्याने आधी आपले नाव लिहिण्याची विनंती त्यांनी केली. यावरून कारले यांनी वाद घातला आणि त्यानंतर शिवीगाळ करत आपल्या कानाखाली लगावल्याचे सांगवीकर यांनी सांगितले आहे.

अपात्र झोपडी पात्र करण्यासाठी आपल्यावर या वकिलाकडून दबाव टाकण्यात आला. या दबावाला बळी न पडल्याने असे खोटे आरोप करत आपली बदनामी करण्याचे हे षडयंत्र असल्याचे कारले यांनी मुंबई लाइव्हला सांगितले आहे. तर आपली बाजू वरिष्ठांसमोर मांडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याने सांगवीकर यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. दरम्यान, कारले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचे त्वरित निलंबन करावे अशी मागणीही सांगवीकर यांनी केली आहे. याविषयी कारले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. 

Loading Comments