Advertisement

जीएसटीमुळे महापालिकेच्या तिजोरीची भरभराट


जीएसटीमुळे महापालिकेच्या तिजोरीची भरभराट
SHARES

मुंबई महापालिकेचा जकात कर बंद झाल्यानंतर नुकसानभरपाई म्हणून सरकारच्या वतीनं ‘जीएसटी’तून प्रत्येक महिन्याला ६४७.३४ कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जुलै २०१७ पासून महापलिकेच्या तिजोरीत जीएसटीच्या हप्त्याची रक्कम जमा होत असून आतापर्यंत ५१७८.७२ कोटी रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेली आहे.


महापालिकेला मिळाली ८ हप्त्यांची रक्कम

महापालिकेचा जकात कर बंद होऊन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्यात जकात बंद करून जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे जकातीपोटी मिळणाऱ्या महसुलाची नुकसानभरपाई महापालिकेला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. महापालिकेला जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाएवढी रक्कम जीएसटीतून भरपाई म्हणून प्रत्येक महिन्याला ६४७.३४ कोटी रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिला हप्त्याच्या रक्कमेचा धनादेश ५ जुलैला महापालिकेला देण्यात आला. त्यानंतर इस्क्रो अकाऊंटच्या माध्यमातून आतापर्यंत ८ हप्त्यांची रक्कम महापालिकेला देण्यात आली आहे.


५ तारखेला जमा होते रक्कम

दर महिन्याच्या ५ तारखेला ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत एकूण ५१७८.७२ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षातील एका हप्त्याची रक्कम शिल्लक आहे. यातून अधिक ६४७.३४ कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जीएसटीतून महापालिकेच्या तिजोरीत मार्चपर्यंत ५८२६.०६ कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा