Advertisement

ग्लोबल वेस्टनंतर समय परिवहन कंपनीही होणार कचरा कंत्राटात बाद?

ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला बाद केल्यानंतर आता के-पूर्व विभागाच्या कामासाठी पात्र ठरलेली समय परिवहन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीही बाद होणार आहे. ग्लोबल वेस्ट कंपनीच्या संचालिका या परिवहन कंपनीतही संचालक असल्यामुळे या कंपनीला कंत्राटातून बाद ठरवले जाण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ग्लोबल वेस्टनंतर समय परिवहन कंपनीही होणार कचरा कंत्राटात बाद?
SHARES

मुंबईतील कचरा वाहून नेण्यासाठीची कंत्राट निविदा प्रक्रिया संपली आहे. सात वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात येत आहे. डेब्रिज भेसळ प्रकरणाचा तिढा सुटल्याने आता या कंपन्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. पण कविराज आणि विश्वशक्ती या काळ्या यादीतील कंपन्यांची भागीदारी असल्याने ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला बाद केल्यानंतर आता के-पूर्व विभागाच्या कामासाठी पात्र ठरलेली समय परिवहन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीही बाद होणार आहे. ग्लोबल वेस्ट कंपनीच्या संचालिका या परिवहन कंपनीतही संचालक असल्यामुळे या कंपनीला कंत्राटातून बाद ठरवले जाण्याची प्रक्रिया सुरू आहे.


हा तिढा आता सुटणार?

मुंबई महानगर पालिकेने कचरा वाहून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी १४ गटांमध्ये विभागून काम देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सात वर्षांसाठी काढल्या जाणाऱ्या कंत्राटासाठी १८०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण विद्यमान कंत्राटदारांमधले काही कंत्राटदार नवीन कंत्राटात पात्र ठरले असून त्यांना डेब्रिज भेसळ प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. पण आता डेब्रिज भेसळ घोटाळ्याचा तिढा सुटण्याची शक्यता असून त्यामुळे महापालिका घनकचरा विभागाने वादात नसलेल्या ९ गटांच्या कंत्राटाचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवले आहेत.


यांना पुन्हा कंत्राट मिळणार?

मात्र, या १४ गटांच्या कामांमध्ये काळ्या यादीतील कंत्राटदारांशी भागीदार कंपनी असल्याने ग्लोबल वेस्ट कंपनीबाबत कायदेशीर मत मागवून त्यांना बाद ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रस्ताव राखून ठेवले आहेत. पण ग्लोबल वेस्ट कंपनीच्या संचालिका सोनिया जैन या समय परिवहन कंपनीच्याही संचालिका आहेत.



निविदा कार्यवाही थांबवली

के-पूर्व विभागातील कचरा वाहून नेण्याचे कंत्राट झिरो वेस्ट मॅनेजमेंट आणि समय परिवहन या कंपन्यांना संयुक्तपणे मिळाले आहे. पण समय परिवहन कंपनीचे संचालक हे काळ्या यादीतील कंपन्यांच्या संचालकांशी संबंधित असल्यामुळे याबाबतचा निर्णय विधी खात्यामार्फत होणाऱ्या अभिप्रायानुसारच घेण्यात येणार असल्याचे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या दोन्ही बाबतीत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्यामुळे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या गटाकरताच्या निविदेची कार्यवाही थांबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या १९९२च्या आणि सुधारित २०१५ आणि २०१६ नोंदणी कायद्यान्वये कोणत्याही काळ्या यादीतील कंपनीचा भागीदार, संचालक, मालक, भागधारक अथवा नातेवाईक जर अन्य कंपनीत असेल, तर संबंधित कंपनीला काम देण्यात येऊ नये, असे नमूद केले आहे. त्याच आधारे ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट आणि आता समय परिवहन कंपनीला काम न देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.



हेही वाचा

कचऱ्यात डेब्रिज भेसळ करणारे कंत्राटदार निर्दोष?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा