Advertisement

वारकरी लाठीमारप्रकरणी संजय राऊतांचा संताप, विरोधकही आक्रमक

वारक-यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

वारकरी लाठीमारप्रकरणी संजय राऊतांचा संताप, विरोधकही आक्रमक
SHARES

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आळंदीत वारक-यांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली. ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे. आळंदीच्या वारीचं नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं. देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसं जावं याचं नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दृढाचार्य तिथे बसून करत होते. यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी, ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे. राजकीय टग्यांची नाही. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतंय, त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारच शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले. 

“वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. पंढीरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. अख्ख्या जगात वारीचा सन्मान केला जातो. नियोजन, संयम, शांतता शिस्त अशी वारी असते. अशाप्रकारचं संकट कधी आलं नव्हतं. या सरकारची लोकं विठूमाऊलीची महापूजा करायला जातील. त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी महाराष्ट्र आणि वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, वारी ही महाराष्ट्राची पुरोगामी पंरपरा आहे, या परंपरेनं सगळ्या धर्माच्या माणसांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचं काम वारकऱ्यांनी केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. वारकरी परंपरेनं हे काम केलं. परंतु या परंपरेला संपवण्याचं पाप जातीवादी सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सुरू झालं. या परंपरेला सरकारने गालबोट लावण्याचं काम केलं. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. त्यामुळे थोडी लाज लज्जा असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो.

छगन भुजबळ म्हणाले की, आळंदी येथे वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीत वारकरी बांधवांचा झालेला हा अपमान अत्यंत निषेधार्ह आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी बांधव यांच्याबद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? शासनाने तातडीने याची दखल घेऊन हा प्रकार घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा