
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट मांडताना शेअर बाजारातील व्यवहारांवर लागणाऱ्या STT (Security Transaction Tax) मध्ये वाढ केली. या एका घोषणेने शेअर बाजारात भूकंप आला असून, सेन्सेक्स तब्बल 2300 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टी 800 अंकांनी घसरला आहे.
शेअर बाजारात 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने या व्यवहारांवरील STT 0.1 टक्क्यांवरून वाढवून 0.15 टक्के केला आहे.
सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जेव्हा शेअर्सची खरेदी-विक्री करता, तेव्हा सरकारला द्यावा लागणारा 'व्यवहार कर' आता महागला आहे.
सलग दुसऱ्या बजेटमध्ये ही वाढ झाल्याने ट्रेडर्समध्ये नाराजी आहे आणि म्हणूनच बाजार जोरदार कोसळला.
बजेटच्या घोषणेनंतर वेदांता, हिंदुस्थान झिंक 10% , हिंदुस्थान कॉपर 18% आणि हिंडाल्को यांसारख्या मेटल शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.
BSE आणि Groww सारख्या प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्येही हाहाकार उडाला. तर बाजारात घसरण असली तरी डिफेंस क्षेत्रातील शेअर्स मात्र जोरात धावत आहेत.
BEL, माझगाव डॉक, कोचीन शिपयार्ड आणि HAL यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बाजारात जरी सध्या भीतीचे वातावरण असले, तरी सरकारने एक दूरगामी निर्णय घेतला आहे. आता भारतीय मूळचे परदेशी नागरिक (PIO) थेट भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार आहेत. यामुळे परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणात पैसा येईल, अशी आशा आहे.
