Advertisement

शिवसेना भाजपात कचरापेट्यांवरून युद्ध


शिवसेना भाजपात कचरापेट्यांवरून युद्ध
SHARES

चारकोपमधील शिवसेना नगरसेविका संध्या विपुल दोषी यांनी सोसायट्यांना देण्यासाठी नगरसेवक निधीतून खरेदी केलेल्या कचरापेट्यांचे वाटप जनतेला न करता त्यांचा साठा करून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बोरिवलीतील एका व्यायामशाळेच्या तीन खोल्यांमध्ये या कचरापेट्यांचा साठा करून ठेवल्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीने उघडकीस आणला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या कचरापेट्यांचे वाटप न केल्याप्रकरणी संध्या दोषींसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आचारसंहितेमुळे आपल्याला ५० डबे वाटता आले नव्हते, तेच हे डबे असून व्यायामशाळेचा ताबा घेण्यासाठी भाजपा नगरसेविकेनेच आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप संध्या दोषी यांनी केला आहे.


दोषी आणि खेडेकर यांच्यात जुंपली

गोराई चारकोपमधील क्रांती उद्यानातील व्यायामशाळेच्या जागेत शिवसेना नगरसेविका संध्या दोषी यांच्या नगरसेविका निधीतून खरेदी करण्यात आलेल्या कचऱ्याच्या डब्यांचा साठा आढळून आला असून त्यानंतर स्थानिक भाजपा नगरसेविक अंजली खेडेकर यांनी येथील खोल्यांना कुलुपं ठोकली. या व्यायामशाळेचा ताबा संध्या दोषी यांच्याकडे असल्यामुळे तो ताबा घेण्याचा प्रयत्न भाजपा नगरसेविकेकडून झाला आहे. त्यामुळे व्यायामशाळेची जागा ताब्यात घेण्यासाठी दोषी आणि खेडेकर यांच्यात चांगली जुंपली आणि खेडेकर यांच्या समर्थकांनी दोषी यांच्यावरच हल्ला चढवला. त्यामुळे याचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि उलट भाजपानेच शिवसेना नगरसेविका आणि तिच्या पतीच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांनी आर मध्य  विभाग कार्यालयांबाहेर  ठिय्या मारत आंदोलन केले.


पंचनामा करून जागेला सिल

भाजपाच्या स्थानिक नगरसेविकेने ही बाब उघडकीस आणल्याचे सांगत भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या जागेचा पंचनामा करून या जागेला सिल ठोकले असल्याचे सांगितले. या कचरा पेट्या २०१५-१६च्या असून जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या या कचरा पेट्या कशा काय शिल्लक राहिल्या? त्यावेळी जर दोषी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या तर त्या कचरा पेट्यांवर शिवसेनेचा स्टिकर कसा काय? असा सवाल करत आपण आणि प्रवीण दरेकर असे दोन आमदार विभाग कार्यालयात गेल्यानंतर सहायक आयुक्तांना आम्हाला प्रभाग समिती अध्यक्षांनी भेटू दिले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.


त्या केवळ ५० कचरापेट्या

मात्र, संध्या दोषी यांनी व्यायामशाळेची जागा मी २०११रोजी गटनेत्यांच्या निर्णयानुसार घेतली असून त्याबाबत केलेल्या प्रत्येक पत्रव्यवहाराची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. तत्कालीन आमदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांनी आक्षेप घेतल्यामुळे ही व्यायामशाळा बंद होती, असे त्यांनी सांगितले. मला ५०० कचरा पेट्या वाटपासाठी मिळाल्या होत्या. त्यातील ४५० कचरा पेट्या आपण शिवसेनेत प्रवेश केल्यानंत शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याहस्ते वाटले. परंतु त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे ५० कचरा पेट्या शिल्लक राहिल्या होत्या. याही तुटलेल्या आहेत, असे सांगितले.


आम्हालाच  मारुन भाजपाच्या खोट्या तक्रारी

भाजपाच्या अंजली खेडेकर यांनी जबरदस्तीने व्यायामशाळेचा ताबा घेऊन आम्ही ठोकलेले टाळे  फोडून टाकले. परंतु त्यानंतर आपण कागदपत्रे दाखवल्यानंतर तिने आपल्या कार्यकर्त्यांना सांगून माझ्यावर हल्ला करायला सांगितला. यामध्ये माझे कपडे फाटले गेले. मला मारहाण करून उलट हीच माणसे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवायला गेली. माझ्या ड्रायव्हरकडे रिल्व्हॉल्वर आहे. परंतु त्याने ते न दाखवताही त्यांनी आपल्याला बंदूक दाखवून धमकावल्याचा खोटा आरोप करत तक्रार केली असल्याचे दोषी यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा