Advertisement

सायन रुग्णालयातील शवागृह दहा दिवसांपासून बंद


सायन रुग्णालयातील शवागृह दहा दिवसांपासून बंद
SHARES

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शवागृह हे मागील दहा दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयातील मृतांचे शव भाभा रुग्णालयातील शवागारात पाठवले जात असून त्यामुळे शवविच्छेदन करण्यास दोन ते तीन दिवस लागत आहे. शवागारातील वातानुकुलित यंत्रणांमधून आवश्यक प्रमाणात कुलिंग होत नसल्यामुळे त्या शवागाराचा वापर केला जात नसल्याचं बोललं जात आहे.


निविदा कुणासाठी रद्द केल्या?

मुलुंड येथील गुरुगोविंद सिंग मार्गावर झाडाची फांदी पडून जखमी झालेल्या तिघांना महापालिकेच्या एम.टी.अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, या रुग्णालयात उपचार यंत्रणा त्वरीत न मिळाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर आंदोलन करत स्थानिक नगरसेवक व प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
एम.टी.अगरवाल रुग्णालयाच्या बांधकामासाठी तीन वेळा काढलेल्या निविदा रद्द केल्या असून याला होणाऱ्या विलंबाबाबत स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी उपोषण आंदोलनही केलं होतं. त्यामुळे कुणासाठी या रुग्णालयाच्या निविदा रद्द केल्या जात आहेत, असा सवाल पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी केला.


'ही शरमेची बाब'

कोटक यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर बोलताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी शीव रुग्णालयातील शवागार दहा दिवसांपासून बंद असल्याचं सांगितलं. रुग्णालयात मृत पावणाऱ्या रुग्णाचं शव विच्छेदन करायचं असल्यास ते भाभा रुग्णालयातील शवागारात पाठवले जाते.
तेथून मग शव आणून शवविच्छेदन केलं जातं. त्यामुळे शव विच्छेदन करण्यास दोन ते तीन दिवस लागत असून केवळ शवागारातील कुलिंग कमी झाल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला केवळ वातानुकुलित यंत्रणांमधील कुलिंग कमी झाल्यामुळे शवागार बंद ठेवावं लागतं, ही शरमेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

सपाचे रईस शेख यांनी नायर रुग्णालयात एका रुग्णाचं शवच मिळत नसल्याचं सांगत पायाला दुखापत झालेल्या आणि जनरल वॉर्डात दाखल असणाऱ्या रुग्णाचेही मृत्यू व्हायला लागलेत, तर मग या रुग्णालयावर कोणी विश्वास ठेवायचा असा सवाल केला.


'प्रशासनानं गंभीर होण्याची गरज'

जकात कर रद्द झाल्यामुळे बंद झालेल्या जकात नाक्यांच्या जागी महापालिकेच्यावतीनं ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी केली. या जकात नाक्यांच्या जागांचा वापर कोस्टल रोडच्या यार्डसाठी करण्यात येवू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे प्रशासनानं गंभीर होण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, भाजपाचे प्रभाकर शिंदे आदींनी भाग घेतला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा