Advertisement

स्लेटररोड 'एएलएम'ला हवीय तरूण पिढीची साथ


स्लेटररोड 'एएलएम'ला हवीय तरूण पिढीची साथ
SHARES

ग्रॅण्ट रोड पश्चिमेकडील स्लेटर रोड परिसर एकेकाळी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि निटनेटकेपणासाठी ओळखला जात होता. यामागचे कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या सहकार्याने येथील रहिवाशांनी २००० साली या विभागात 'अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट' अर्थात 'एएलएम'ची स्थापना करून परिसराचा कायापालट करण्याचे ठरवले होते. त्यानुसार रहिवाशांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन प्रशासनाच्या मदतीने ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वीही करून दाखवली. मात्र काही वर्षांनंतर या 'एएलएम'च्या प्रमुखांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर स्लेटर रोड 'एएलएम'ला उतरती कळा लागली. यातून सावरत पुन्हा एकदा यशाची झेप घेण्यासाठी स्लेटर रोड 'एएलएम'ला आता तरूण पिढीची साथ हवी आहे.

या 'एएलएम'मध्ये एकूण २७ इमारती आहेत. ज्यात जवळपास ८०० घरे आणि दुकानांचा समावेश होतो. या विभागातून दरमहा जवळपास १८ लाख किलो कचरा महापालिकेकडे जमा होतो. या 'एएलएम' मध्ये तुकाराम जावजी मार्ग आणि नौशीर भरूचा मार्गाचा समावेश होतो. याच मार्गाचे जुने नाव स्लेटर रोड असे होते.

'एएलएम'च्या उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या जोरावर २००० ते २००८ पर्यंत हा परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि हरित होता. मात्र या 'एएलएम'चे प्रमुख योगेंद्र शहा यांचे निधन झाल्यानंतर या 'एएलएम' ला उतरती कळा लागली. सद्यस्थितीत या 'एएलएम'मध्ये सर्वाधिक कार्यरत सदस्य आता वयस्कर झाले आहेत. त्यातच परिसरातील तरूणांना 'एएलएम'च्या कामात जराही रस नसल्याने या 'एएलएम' उतरती कळा लागली आहे. विभागातील तरूणांनी पुढाकार घेतल्यावरच या 'एएलएम'ची दशा सुधारेल, असे स्लेटररोड 'एएलएम'च्या ८४ वर्षीय अध्यक्षा नर्गिस साबावाला यांनी सांगितले.

स्लेटररोड 'एएलएम'चा सर्व कारभार वयस्कर सदस्यांच्याच हाती असल्याने अद्ययावत यंत्रणेची हाताळणी करणे, पालिकेसोबत दररोज पत्रव्यवहार करणे या सदस्यांना जिकरीचे जात आहे. यामुळे सरकारी यंत्रणेकडून हवी असलेली कामे करून घेण्यात असंख्य अडचणी येत आहेत.
स्लेटररोड 'एएलएम'ची परिसरावरील पकड ढिली झाल्याने सद्यस्थितीत नौशीर भरूचा मार्गावरील एका बाजूच्या पदपथांवर अतिक्रमणे झाली असून त्यावर समाजकंटकांचा वावर वाढला आहे, अशी माहिती स्थानिक रहिवासी अर्माइटी दस्तूर यांनी दिली.

विभागातील एक बाजूचे पदपथ नाहीसे झाल्याने स्थानिकांना रस्त्यावरुन चालत जावे लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून महापालिकेने येथील पदपथावर सायकल स्टॅन्ड केल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

विभागातील तरूण पिढीने स्लेटररोड 'एएलएम'चे कामकाज सांभाळण्याची तयारी दाखवल्यास या 'एएलएम'चे व्यवस्थापन पुन्हा एकदा सुधारू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा