Advertisement

वो तो है सटकेला!

सोशल मीडियाने सर्वांना उच्चारस्वातंत्र्य बहाल करताना दोन घातक गोष्टीही रूढ केल्या आहेत… आपला अधिकार किंवा योग्यता यांचा विचार न करता, जबाबदारी न घेता, उचलली जीभ टाळ्याला लावून असहिष्णु टगेगिरी करण्याला त्यांनी जनअभिव्यक्तीचा दर्जा देऊन टाकला आहे…

वो तो है सटकेला!
SHARES

वो तो है सटकेला, हजारों में अकेला!

हे शीर्षक वाचल्यावर अनेक वाचकांना ‘जाने दो जाने दो मुझे जाना है’ या गाण्यातल्या नायकाप्रमाणे प्रश्न पडेल, ‘कौन है वो? बोलो बोलो कौन है वो?’ या प्रश्नावर त्याच गीताच्या चालीवर, मराठी-हिंदीचा समन्वय साधून उत्तर द्यावं लागेल, ‘बडी घाSSण है वोSSS…’ 

…हा जो ‘वो’ आहे ना, तो ‘तो’ही असू शकतो आणि ‘ती’ही असू शकते, बरं का!… 

…हे सटकलेले ‘वो’ सापडतात फेसबुक-व्हाॅट्सअॅप-ट्विटरसारख्या सोशल मीडियावर… 

…एखादा नामवंत, कीर्तीवंत, यशवंत माणूस काहीतरी बोलतो, काहीतरी करतो, काहीतरी लिहितो, कधी आजारी पडतो किंवा कधी मरण पावतो… त्या त्या वेळेला हा सटकलेला ‘वो’ सोशल मीडियावर अत्यंत विखारी आणि विषारी असं काहीतरी बरळतो… तो फेसबुकवर पोस्ट लिहितो, व्हाॅट्सअॅपवर निनावी संदेश प्रसृत करतो किंवा ट्वीट लिहितो… अनेकदा ती प्रसिद्ध व्यक्ती ट्विटरवर असेल, तर तिच्या ट्वीटवर अत्यंत विखारी, अतिशय व्यक्तिगत टिप्पणी करणारा रिप्लाय देतो… त्यातही जेव्हा प्रसिद्ध व्यक्ती एखाद्या विचारधारेच्या शेपटावर पाय देणारी असते, तेव्हा तर मळमळ दाटून येणाऱ्यांची संख्या मोठी असते… त्यांना या ‘वो’च्या रिप्लायमधून किंवा पोस्टमधून त्यांचीच भावना व्यक्त झाल्याचा आनंद मिळतो आणि मग ते ट्वीट रिट्वीट होतं, त्याला लाइक मिळतात, ती पोस्ट शेअर होते किंवा व्हाॅट्सअॅपवर व्हायरल होते आणि त्या परजीवी बांडगुळाला, परप्रकाशी क्षुद्र कणाला ‘जितंमया’चा रोगट आनंद मिळतो…

…इथे एक मुद्दा यशवंत, कीर्तीवंत, नामवंत माणसाने काही मत मांडलं तर ते सगळ्यांना पटलंच पाहिजे का, त्याच्याशी दुमत असू शकतं की नाही? त्याच्या एखाद्या कृतीबाबत, वक्तव्याबाबत काही मतभेद संभवतात की नाही? जरूर संभवतात. किंबहुना निर्भीडपणे कुणालाही, कशावरही मत व्यक्त करता येणं, यालाच तर लोकशाही म्हणतात… पण, ही झाली अर्धीच बाजू… लोकशाहीमध्ये आपल्याला नुसता मताची पिंक टाकण्याचा अधिकार नाही आणि सोशल मीडियाच्या वाॅल्स या काही सार्वजनिक ठिकाणच्या भिंती नाहीत, थुंकून, बरबटवून लाल करण्यासाठीच्या… लोकशाहीत मतभेद किंवा विरोधी विचारही लोकशाही पद्धतीनेच व्यक्त करायचा असतो… ‘अभ्यासोनि प्रकटा’यचं असतं, ही लोकशाहीने दिलेल्या त्या स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारीची जोड आहे… मतभेद व्यक्त करताना समोरच्या माणसाची अक्कल काढणे, त्याच्याशी एकेरीवर येणे, त्याच्याविषयीच्या गावगप्पा चघळणे, त्याच्यावर बिनपुराव्याचे हेत्वारोप करणे, त्याला थेट देशद्रोही, पाकिस्तानी किंवा भक्त वगैरे ठरवून मोकळे होणे, याला प्रतिसादही म्हणता येत नाही किंवा प्रतिवादही म्हणता येत नाही… निव्वळ मळमळीतून झालेल्या ओकाऱ्या असतात त्या…


…सोशल मीडियाने सर्वांना उच्चारस्वातंत्र्य बहाल करताना दोन घातक गोष्टीही रूढ केल्या आहेत… आपला अधिकार किंवा योग्यता यांचा विचार न करता, जबाबदारी न घेता, उचलली जीभ टाळ्याला लावून असहिष्णु टगेगिरी करण्याला त्यांनी जनअभिव्यक्तीचा दर्जा देऊन टाकला आहे… प्रस्थापित प्रसारमाध्यमांमध्ये लिहिणारा नावाने लिहितो, सविस्तर मुद्देसूद लिहितो आणि त्या लेखनाची जबाबदारी घेतो, या सगळ्याचा समाजमाध्यमांमध्ये पत्ताच नाही… 

…इथे कोणीएक बाई उठते आणि कोरोनाग्रस्त अभिषेक बच्चनला म्हणते, ‘चांगला कमावता बाप मिळाला म्हणून तुला या वयातही बसून खाण्याची सोय झाली.’ अभिषेक सुसंस्कृत असल्यामुळे विनोदाने उत्तरतो, ‘सध्या दोघेही हाॅस्पिटलात आडवे पडून खातोय…’ अहो ताई, तुमच्याकडे माधुकरी मागायला येतोय तो की वार लावून जेवायला येतोय? तो त्याच्या वडिलांचं खातोय की काय करतो, याच्याशी तुमचा काय संबंध? हा काय प्रकारचा संवाद आहे? पण, पाचपोच, विधिनिषेध नसणं आणि संस्कारशून्यता हेच या सटकलेल्या ‘वों’चं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं…

…त्यांचे सोशल मीडियावरच व्हायरल होणारे विखार पाहून समाजातली सुज्ञ माणसं घाबरीघुबरी होतात आणि हे सगळं काय सुरू आहे, सगळी माणसं इतकी एकांगी आणि विषाक्त होऊन गेलेली आहेत की काय, अशी त्यांच्यात चर्चा सुरू होते… त्यांचीही वेगळी गंमत असते… पाहा पाहा या माणसाने काय घाण ओकून ठेवलेली आहे, म्हणून तेही तीच शिटाने बरबटलेली पत्रावळ पुढे गावभर वाटत फिरतात…

…आपण इतकं महत्त्व का देतो आहोत या सटकलेल्या ‘वों’ना?... ते हजारोंमध्ये एखाददुसरेच आहेत अजूनही… त्यांची खरोखरची पोहोच तरी नेमकी किती आहे? या देशात ट्विटरचे वापरकर्ते आहेत एक कोटी ७० लाख, म्हणजे देशाच्या लोकसंख्येत एक टक्क्यापेक्षा थोडे जास्त… ट्विटर हे इंग्रजीतलं आणि थोडक्यात व्यक्त होण्याचं माध्यम असल्याने खऱ्या अर्थाने तेवढं ‘सोशल’ नाही… पण, फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपचं काय? त्यांनी तर भारतीय जनमानसात केवढा शिरकाव केलाय, तिथे काहीतरी व्हायरल होणं म्हणजे सगळ्या समाजमनाचा आरसाच… असं वाटतंय ना तुम्हाला? मग २०२० साली या दोन माध्यमांचा वापर किती लोक करतायत, ते पाहा. दोन्हीकडे वापरकर्त्यांची संख्या ३४ कोटींच्या आसपास आहे… म्हणजे या सर्वाधिक प्रसार झालेल्या समाजमाध्यमांचाही देशातल्या तब्बल दोन तृतियांश जनतेशी काहीही संबंध नाही… 

आता विचार करा, फेसबुकवर तुमचे पाच हजार मित्र असतात तेव्हा त्यातले प्रत्यक्षात अॅक्टिव्ह पाचसातशेच असतात… बाकीचे बहुतेक डाॅर्मंट युजर्स असतात… अवसेपुनवेला उगवणारे… एखादी पोस्ट फेसबुकने पैसे घेऊन व्हायरल केली आणि ती अनेकांनी शेअर केली तरी एकाच वेळी ती कोट्यवधी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचत नाही… समजा एखादी पोस्ट ३४ कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचली तरी सगळे काही शुंभासारखे विखारात वाहून जात नाहीत, अपशब्दांना, गैरभावनांना माना डोलावत नाहीत आणि सगळ्यांनी तसं केलं तरी त्यांची संख्या एक तृतियांशही नाही… तेव्हा या अर्धकच्च्या शितावरून भाताची परीक्षा कशाला करायची? 

घरात भेंडी चिरताना बोट कापून घेणारे हे बुळबुळीत लोक सोशल मीडियावर पद्धतशीर बहकाव्यात येऊन, चिथावणीला बळी पडून यांना कापू, त्यांना मारू, असल्या ऊष्ण उसळ्या घेत असतात, काहींना तसं करण्याचे पैसे मिळत असतात, तो त्यांचा व्यवसाय आहे आणि काही त्या विचारधारेलाच लागलेले असतात… त्यांच्या कोत्या मनाच्या, संकुचित वृत्तीच्या, असहिष्णू, असंस्कृत पिचकाऱ्या म्हणजे देशातल्या समस्त जनतेचं मत किंवा देशाचा कौल, कल वगैरे ठरत नाही… 

…कधी तसं वाटलं तर मोबाइल बाजूला ठेवा, कम्प्यूटर, लॅपटाॅपसमोरून उठा आणि त्या कोंदट अवकाशातून बाहेर मोठी फेरी मारून या कोरोनाकाळात जमेल तेवढी… आसपासची जिवंत माणसं पाहा, त्यांच्यातले व्यवहार पाहा… ते अजून या घाणीने बरबटलेले नाहीत… त्यांची मुळं अजून मातीतून सुटलेली नाहीत… हितसंबंधियांनी उसळवून दिलेल्या वादळ-वावटळींमध्ये सगळंच काही उन्मळून गेलेलं नाही…

शीर्षकासाठी वापरलेल्या गीताच्या ओळींचाच आधार घ्यायचा तर हे गाणं असं पूर्ण करावं लागेल… ‘वो तो है सटकेला, हजारों में अकेला, सदा तुमने द्वेष देखा, मुहब्बत ना देखी…’


हेही वाचा -

एक प्रवास अमिताभचा आणि आपलाही!

वैद्यकीय तपासणी करून घ्यायलाच हवी… हो ना?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा