मिलन उड्डाणपुलाखालील परिसर होणार चकाचक

 Pali Hill
मिलन उड्डाणपुलाखालील परिसर होणार चकाचक

मुंबई - अनधिकृत वाहनतळ आणि बेघरांचे बस्तान यामुळे उड्डाणपुलाखालील जागांना विद्रुपता आणली जात आहे. त्यामुळे आता उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. विलेपार्ले आणि अंधेरीमधील मिलन सब-वेवरील उड्डाणपुलाखालील परिसरही सुशोभित केला जाणार आहे. हा परिसर सुशोभित करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करून दिला जाणार आहे.

मुंबईतील माटुंगा येथील उड्डाणपुलाखालील भागाचे सुशोभीकरण केल्यानंतर आता टप्प्या-टप्प्याने उड्डाणपुलाखालील रिकाम्या जागांचे सुशोभीकरण केले जात आहे. महापालिकेच्या के/पूर्व आणि एच/पूर्व या महापालिका प्रभागांच्या हद्दीत येणाऱ्या मिलन उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या पुलाखालील जागेत संरक्षण जाळी बसवून आतील जागेत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये अंतर्गत पाथ-वे आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा अशाप्रकारे बांधकाम केले जाणार आहे. पुलाखालील खांबांना रंगरंगोटी करणे आदी कामे करून नागरिकांना सकाळी आणि संध्याकाळी फेर-फटका मारता यावा म्हणून जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी 77 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिली आहे.

गांधीनगर पुलाखालील जागेचा होणार विकास

महापालिकेच्या एस प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील गांधीनगर उड्डाणपुलाखाली संरक्षण भिंत, अंतर्गत पदपथ, अंतर्गत जागेचा विकास करून फुल-झाडांसह रॉक उद्यान विकसित करणे, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था बनवणे, पदपथाच्या बाजूला फुलझाडे लावणे, हिरवळीचे उंचवटे बनवणे आदी कामे करत या जागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे. याठिकाणी विशेष म्हणजे सीसीटीव्ही कॅमेराही बसवले जाणार आहेत, असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी सांगितले. यासाठीही कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली असून 91 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

Loading Comments