Advertisement

ड्रोनद्वारे होणार 'एसआरए'मधील झोपड्यांचं सर्वेक्षण


ड्रोनद्वारे होणार 'एसआरए'मधील झोपड्यांचं सर्वेक्षण
SHARES

झोपडीपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) म्हटलं की बोगस झोपड्या, बोगस झोपडीधारक आलेच. प्रत्येक प्रकल्पात बोगस झोपड्या आणि बोगस झोपडीधारक असतातच. झोपडीचा पत्ता नसतो पण झोपडीधारकाचं नाव असतं. झोपडी असली तरी झोपडीधारक कुणी भलताच असतो. त्यामुळे एसआरए योजनातून बोगस झोपड्या आणि बोगस झोपडपट्टीधारकांना हद्दपार करण्यासाठी एसआरएने डोअर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा आधार घेतला असून हे सर्वेक्षण सध्या जोरात सुरू आहे. मात्र या सर्वेक्षणाचा वेग अतिशय धीम्या गतीचा असल्यामुळे बोगस झोपडीधारकांचा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे सर्वेक्षण जलदगतीनं व्हावं आणि बोगस झोपडी-झोपडीधारकांना आळा बसावा, यासाठी आता एसआरएने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.


१ लाख ९५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

गेल्या वर्षी एसआरएने डोअर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ९५ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. तरी अजूनही लाखो झोपड्यांचं सर्वेक्षण बाकी आहे. दरम्यान, बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या वेळीही झोपडीधारक एका झोपडीला मागून दरवाजा दाखवत असून दोन झोपड्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर इतरही अनेक शकला झोपडीधारकांकडून लढवल्या जात आहेत. त्यामुळे आता ड्रोनद्वारे झोपडपट्टयांचं सर्वेक्षण करत झोपडपट्टीचा नकाशा तयार केला जाणार असल्याची माहिती एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी दिली आहे.


बॅटरी आॅपरेटेड ड्रोनचा वापर

बॅटरी आॅपरेटेड ड्रोनच्या सहाय्यानं हे सर्वेक्षण करण्यात येणार असून या तंत्रज्ञानामुळे पाच वेगवेगळ्या पद्धतीनं झोपड्यांचे फोटो घेता येणार आहेत. त्यातून झोपड्यांचं अचूक सर्वेक्षण होणार असल्याचा दावा एसआरएकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वेक्षणही वेगानं होणार असल्याचंही एसआरएच म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे, बोगस झोपडीधारकांना यामुळे दणका बसणार आहेच पण त्याचबरोबर झोपड्यांची संख्या वाढवून एफएसआय लाटणाऱ्या बिल्डरांनाही मोठा झटका बसणार असल्याचा एसआरएचा दावा आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा