परेलच्या सेंट झेवियर्स मैदानावर खेळाऐवजी कारपार्किंग!


  • परेलच्या सेंट झेवियर्स मैदानावर खेळाऐवजी कारपार्किंग!
  • परेलच्या सेंट झेवियर्स मैदानावर खेळाऐवजी कारपार्किंग!
  • परेलच्या सेंट झेवियर्स मैदानावर खेळाऐवजी कारपार्किंग!
SHARE

संस्थांना दिलेल्या मोकळ्या मैदानाच्या जागा राजकीय दबावापोटी परत घेण्यास चालढकल केली जाते. एका बाजूला या जागा परत घेतल्या जात नाही आणि दुसरीकडे या जागांचा व्यावसायिक वापर करत खो-याने पैसे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परेलमधील सेंट झेवियर्स मैदानाची जागा मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या ताब्यात आहे. पण या मैदानाचा वापर सिनेमांचे चित्रिकरण आणि त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी केला जात आहे. या असोसिएशनच्या अध्यक्षपदी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे असून, असोसिएशनकडूनच असा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

संस्थांना दिलेल्या मोकळ्या जागा परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आतापर्यंत 216 मोकळ्या भूखंडांपैकी केवळ 150 जागा परत घेण्यास महापालिकेला यश आले आहे. मात्र, अद्यापही 60 हून अधिक मोकळ्या जागा परत घेण्यात आलेल्या नाहीत. या उर्वरित जागांमध्ये आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या ताब्यातील परेल मधील सेंट झेवियर्स हे एक मैदान आहे.


हेही वाचा -

मैदान असूनही खेळता येईना!


हे मैदान सामान्यांसाठी खुले करून दिले जात नाही. मात्र चित्रिकरणासह अन्य व्यावसायिक वापर केला जात आहे. मागील 3 दिवसांपासून या मैदानावर चक्क चित्रिकरणाच्या गाड्यांचे पार्किंग केले जात आहे. या मैदानाच्या शेजारील इमारतीमध्ये चित्रिकरण सुरू असून, त्यांच्या गाड्या मात्र मैदानात अनधिकृतपणे उभ्या केल्या जात असल्याचा आरोप खेळाडू आणि स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. एक दोन नव्हे तर 20 ते 25 गाड्या या मैदानात उभ्या केल्यामुळे या मैदानाची दुरावस्था होऊन तिथे खेळणेही कठीण होऊन बसणार आहे. 6 तारखेपासून या गाड्या लागल्या आहेत.हे मैदान एमडीएफएकडे आहे. यावर एमडीएफएने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गणेश माडकर या खेळाडूने केली आहे. 

याबाबत चित्रिकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वाहने रस्त्यात उभी केल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊन लोकांना त्रास होईल, म्हणून मैदानात गाड्या पार्क करण्यात येत आहे. यासाठी उदय बॅनर्जी यांनी एकही पैसा न घेता आम्हाला पार्किंग करण्यास जागा दिली. आम्ही मैदानाच्या आत एका बाजूला गाड्या पार्क केल्या आहेत, जेणेकरून मैदान कुठेही खराब होणार नाही,असे 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना त्यांनी सांगितले.

तर आपण फक्त दोन गाड्यांसाठीच परवानगी दिली होती, पण यांनी त्याहीपेक्षा जास्त गाड्या येथे पार्क केल्या आहेत, असे मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनचे (एमडीएफए) चे सरचिटणीस उदय बॅनर्जी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या