बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षण करणारच - प्रकाश मेहता

  Naigaon
  बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षण करणारच - प्रकाश मेहता
  मुंबई  -  

  नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी पात्रता निश्चितीचे बायोमेट्रिक सर्वेक्षण हाणून पाडले असले, तरी या विरोधाला न जुमानता बायोमेट्रिक सर्वेक्षण करणारच, असा पवित्रा सरकारने घेतला आहे. विरोध करणारे विरोध करतील मात्र आम्ही आमचे काम करत राहू, असे म्हणत लवकरच सर्वेक्षणाला नव्याने सुरूवात होईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर रहिवाशांच्या शंका दूर करत सोमवारपासून सर्वेक्षण सुरू होणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


  हेही वाचा

  बीडीडीतील सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ!

  बीडीडीतील सर्वेक्षण अखेर ठप्प


  बुधवार 17 मे पासून म्हाडा अधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडून या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आली. मात्र अद्याप करार झालेला नसून रहिवाशांच्या मनातील संभ्रम दूर केल्याशिवाय सर्वेक्षण होऊ देणार नाही, असे म्हणत इमारतीतील रहिवाशांनी अधिकाऱ्यांना घरात घुसूही दिले नव्हते. त्यामुळे पहिल्याच दिवशी बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा बट्टयाबोळ झाला. तर रहिवाशांच्या विरोधाचा धसका घेत म्हाडा आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बीडीडीत पाऊलही टाकले नाही. इतकेच नव्हे तर उपजिल्हाधिकाऱ्यांनी थेट म्हाडाला पत्र लिहित रहिवाशांचा विरोध असल्याने आम्ही सर्वेक्षण करणार नाही, आधी त्यांचे प्रश्न मार्गी लावत विरोध दूर करा, अशी मागणी केली होती.

  त्यानुसार म्हाडाने रहिवाशांच्या प्रश्नांची उत्तरे थेट वृत्तपत्रातील जाहिरातीद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे. रहिवाशांचा करार कसा होणार? सर्वेक्षण कसे होणार? संक्रमण शिबिरे कुठे असतील? ती कशी देणार? यासह प्रकल्पाची संपूर्ण माहिती या जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तर प्रकाश मेहता यांच्यासह म्हाडाने विरोधाला न जुमानता सोमवारपासून सर्वेक्षण सुरू करणार असल्याचे सांगितल्याने पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे म्हाडा आणि रहिवाशांमधील संघर्ष वाढण्याचीही शक्यता आहे.

  विरोध करणारच - बीडीडी रहिवासी
  रहिवाशांच्या विरोधाला न जुमानता सर्वेक्षण होणारच, असे मंत्री आणि म्हाडा म्हणत असेल तर रहिवासीही गप्प बसणार नाहीत. सोमवारीही कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण होऊ दिले जाणार नाही, त्यासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा अखिल बीडीडी चाळ रहिवासी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. राजू वाघमारे यांनी दिला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.