• बीडीडीतील सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ!
  • बीडीडीतील सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ!
  • बीडीडीतील सर्वेक्षणाचा पहिल्याच दिवशी बट्ट्याबोळ!
SHARE

बीडीडी पुनर्विकासांतर्गत बुधवारपासून नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीसाठीच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला उपजिल्हाधिकारी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सुरूवात करण्यात आली खरी; पण रहिवाशांनी या सर्वेक्षणाला जोरदार विरोध करत उपजिल्हाधिकाऱ्यांसह म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आल्या पावली पळवून लावले. त्यामुळे पहिल्या दिवशी सर्वेक्षणाचा बट्ट्याबोळ झाला.

बीडीडी चाळीतील रहिवाशांची संमती न घेता त्यांना विश्वासात न घेता पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावला जात असल्याचे म्हणत बीडीडीतील काही संघटनांचा अजूनही या प्रकल्पाला जोरदार विरोध आहे. याप्रकरणी काही संघटनांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. विरोध असताना आणि प्रकल्पाबाबत, पात्रता निश्चितीबाबत रहिवाशांच्या मनात अऩेक संभ्रम असताना ते दूर न करताच पात्रता निश्चितीसाठी बायोमेट्रीक सर्वेक्षण कसे करता? असा सवाल करत या सर्वेक्षणाला विरोध करण्याचा इशारा बीडीडीतील काही संघटनांनी दिला होता.

त्यानुसार बुधवारी उपजिल्हाधिकारी आणि म्हाडाचे कर्मचारी-अधिकारी सकाळी नायगाव आणि ना. म.जोशी मार्ग येथे बायोमेट्रीक सर्वेक्षणासाठी आले असता रहिवाशांनी आणि संघटनांनी जोरदार निदर्शने केली. तर या अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारतीत घुसू न देता सर्वेक्षणच हाणून पाडल्याची माहिती अखिल बीडीडी चाळ रहिवाशी महासंघाचे अध्यक्ष डाॅ. राजू वाघमारे यांनी दिली आहे. त्यामुळे बुधवारी एकाही रहिवाशाचे सर्वेक्षण झाले नसून म्हाडातील एका अधिकाऱ्यानेही याला दुजोरा देत सर्वेक्षणाचे काम सकाळीच बंद पडल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला नाव न छापण्याच्य अटीवर सांगितले.

यावेळी रहिवाशांनी उपजिल्हाधिकारी आणि म्हाडा अधिकाऱ्यांना 19 प्रश्नांचे निवेदन सादर केले. या 19 प्रश्नांची उत्तरे द्या मगच सर्वेक्षण करा, अशी मागणी करत यावेळी वाघमारे यांच्यासह अन्य रहिवाशांनी म्हाडा आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी केली. दरम्यान बुधवारी सर्वेक्षण होऊ शकले नसले, तरी गुरूवारी पुन्हा सकाळी सर्वेक्षणास सुरूवात करण्यात येईल, असेही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता गुरूवारीही सर्वेक्षण होते की अधिकाऱ्यांना आल्या पावली जावे लागते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या