Advertisement

प्लास्टिक बंदी : हातात पिशवी सापडल्यास २०० रुपये दंड


प्लास्टिक बंदी : हातात पिशवी सापडल्यास २०० रुपये दंड
SHARES

मुंबईत येत्या २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीबाबतची काटेकोर अंमलबजावणीची धडक मोहिम हाती घेतली जाणार आहे. मुंबई महापालिकेनं अशाप्रकारे प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी परवाना विभाग, दुकाने व आस्थापना विभाग, मार्केट आदी विभागांमधील निरीक्षकांची पथकं तयार केली आहेत. त्यानुसार प्लास्टिक पिशवी हाताळणाऱ्या नागरिकांसह फेरीवाल्यांना २०० रुपये ते १ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. मात्र दुसऱ्यांदा तुमच्या हातून हा गुन्हा घडल्यास, ५०० ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरताना सापडला तर तुमचा खिसा नक्कीच रिकामा होणार अाहे.

२३ जूनपासून बंदीची अंमलबजावणी

मुंबईसह राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी जाहीर करण्यात आली असून येत्या २३ जूनपासून ही प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी पूर्णपणे लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांसह फेरीवाले, दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी जुन्या नियमांमध्ये थोडा बदल करून सुधारित दंडाची रक्कम समाविष्ठ करण्यात आली आहे.


दंडाची रक्कम जास्त

महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६च्या कलम ९ व १२मध्ये दंडनीय कारवाई तथा खटला करण्याची तरतूद आहे. यामध्ये प्रथम गुन्हा करणाऱ्या प्लास्टिक उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांना ५ हजार रुपये आणि त्यानंतर पुन्हा पकडले गेल्यास दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. प्लास्टिक बंदीची मोहिम यशस्वीपणे राबवायची असल्यास नागरिकांकडून तसेच फेरीवाल्यांकडून एवढ्याप्रमाणात दंड आकारणे योग्य नाही.

दुसऱ्या गुन्ह्यासाठी दुप्पट दंड

त्यामुळे याबाबत आयुक्तांशी चर्चा करून तसंच सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्तांकडून सूचना लक्षात घेऊन पाच आणि दहा हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या तुलनेत जनतेकडून तसंच फेरीवाले, गाळेधारक यांच्याकडून दोनशे ते १ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र दुसऱ्यांदा प्लास्टिक पिशवी हाताळताना पडकल्यास दंडाची रक्कम दुप्पट करावी, असं निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार प्रस्ताव बनवून विधी समितीच्या मान्यतेसाठी पाठवला असल्याची माहिती उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


दंड अाकारण्याबाबत संभ्रम

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास २३ जूनपासून या दंडाची अंमलबजावणी केली जाईल. परंतु प्रस्ताव मंजूर न झाल्यास सर्वांकडून पाच ते दहा हजारांचा दंड वसूल करावा लागेल. पण एवढा दंड नागरिक, फेरीवाले भरू शकत नाही. त्यामुळे नागरिक, दुकानदार व अधिकारी यांच्यामध्ये वादविवाद अधिक निर्माण होऊ शकतो. किरकोळ विक्रेते, फेरीवाले, किराणामाल इत्यादी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून दंड वसूल करण्यास अडचणी निर्माण होतात व दंड भरण्यास तयार नसतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. तसंच भरारी पथकाला नियमाची अंमलबजावणी करण्यास अडचणी निर्माण होत असतात. परिणामी पथकाचा वेळही वाया जातो आणि महापालिकेची प्रतिमाही मलीन होते, असं निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.


यांच्यावर ५ हजाराचा दंड

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादक, वितरक, साठवणूकदार, विक्री करणारे यांना प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये तर दुसऱ्यांदा पकडल्यास १० हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


अशाप्रकारे आकारला जाणार दंड

व्यवसायाचे स्वरूप प्रथम गुन्हा दुसरा गुन्हा
फेरीवाले व मंडईतील किरकोळ विक्रेते२०० रुपये५०० रुपये
किराणा माल व तत्सम किरकोळ विक्रेते५०० रुपये१००० रुपये
दूध, दही, फळे, फळरस, चहा-कॉफी विक्रेते५०० रुपये१००० रुपये
हॉटेल्स तसेच मॉलमधील दुकाने व इतर१००० रुपये२००० रुपये

हेही वाचा -

मुंबईकरांनो, याद राखा! २३ जूनपासून प्लास्टिक पिशवी वापराल तर...

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा


 
  

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा