Advertisement

भायखळा, ठाणे कारागृहातही आता सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन


भायखळा, ठाणे कारागृहातही आता सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन
SHARES

महिला आणि मुलींची मासिक पाळीदरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालयं, सराकरी कार्यालयं, पोलिस ठाणे इ. ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवण्यात येत आहेत. या पाठोपाठ मुंबईसह राज्यभरातील महिला कैद्यांनाही सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याबरोबर वापरलेले नॅपकिन नष्ट करण्याची सुविधा कारागृहात उपलब्ध करून दिली जाणार आहे.


महिला आयोगाचा पुढाकार

मुंबईतील भायखळा कारागृह आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील अन्य ७ कारागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य महिला आयोगानं पुढाकार घेतला असून कारागृहातील महिला कैद्यांच्या सुविधेच्यादृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.



अहवाल सादर

भायखळा कारागृहात गेल्या वर्षी महिला कैदी मंजुळा शेट्ये हिचा संशायस्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर महिला आयोगानं राज्यभरातील कारागृहातील महिला कैद्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षा, आहार, आरोग्य सेवा आणि अन्य सुविधांची तपासणी करण्यासाठी एक विशेष तपासणी पथक नेमलं होतं. या पथकांनं नुकताच आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. याच अहवालात कारागृहांमध्ये महिला कैद्यांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस होती.


कुठल्या कारागृहात सोय?

या शिफारशीनुसार आयोगानं भायखळा, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, औरंगाबाद मध्यवर्ती कारगृह, नागपूर मध्यवर्ती कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, कल्याण मध्यवर्ती कारागृह आणि चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह या ९ कारागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ९ कारागृहांमध्ये ५० सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आयोगातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली.


सुरक्षेची जबाबदारी कारागृहांची

या व्हेंडिंग मशिनच्या सुरक्षा आणि देखभालीची जबाबदारी कारागृहांची असणार आहे. तर सॅनिटरी नॅपकिन मोफत वा माफक दरात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावरच टाकण्यात आली आहे. दरम्यान ९ पैकी २ कारागृहात व्हेंडिंग मशिन लावण्यात आल्या असून उर्वरित ठिकाणी लवकरच मशिन लावण्यात येतील, असंही रहाटकर यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

अस्मिता योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद का नाही?

मासिक पाळीबद्दल लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा