अँटॉप हिलमध्ये भटक्या कुत्र्यांच्या धुमाकूळ

 wadala
अँटॉप हिलमध्ये भटक्या कुत्र्यांच्या धुमाकूळ

वडाळा - अँटॉप हिल येथील शेख मिस्त्री मार्गावरील किरण को-ऑप.हौसिंग सोसायटीत एका महिलेने पाळलेल्या 50 भटक्या कुत्र्यांनी एकच धुमाकूळ घातला आहे. यामुळे इमारतीमध्ये शेकडो कुटुंबं यामुळे चांगलेच त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांचे रात्री अपरात्री एकाच वेळी भुंकणे, इमारतीत पसरलेली मलमूत्राची दुर्गंधी तसेच अंगावर धावून येण्याच्या घटनेमुळे इमारतीतील रहिवासी भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे या कुत्र्यांबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

इमारतीमध्ये भाड्याने राहणाऱ्या आणि एनजीओ चालवणाऱ्या कृष्णा अर्जुन नावाच्या महिलेने इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ सुमारे 50 भटके कुत्रे इमारतीसाठी राखून ठेवलेल्या बागेत अनधिकृतरित्या झोपडे बांधून पाळले आहेत. त्यामुळे वयोवृद्धांना तसेच चिमुरड्यांना बागेत बसणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे या भटक्या कुत्र्यांमुळे इमारतीत येणारे पोस्टमन, दूधवाला, पेपरवाला, केबलवाला, प्लम्बर तसेच भेटायला येणाऱ्या नातेवाईकांवर हातात काठी घेऊन येण्याची नामुष्की ओढावली आहे.

सदरील महिला दिल्लीतील एका प्राणीमित्र एनजीओशी निगडीत असून, तिच्याकडे सोसायटीत भटकी कुत्री पाळण्याचा कोणताही परवाना नाही, असे याच इमारतीत राहणाऱ्या स्थानिक वयोवृद्ध महिला सुशीला कामत यांनी सांगितले. होणाऱ्या त्रासाबाबत रहिवाशांनी महिलेकडे विचारणा केली की ती इमारतीमधील रहिवाश्यांच्या खोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात आणि प्राणीमित्र संघटनेकडे करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.

Loading Comments