Advertisement

छात्रभारती घेणार सोशल संमेलन


छात्रभारती घेणार सोशल संमेलन
SHARES

'राज्यातील शिक्षण व्यवस्था कोसळून पडली आहे, विद्यापीठं अशांत आहेत, शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यातच विद्यार्थी आणि तरुणांच्या चळवळी मोडून काढण्याचं सरकारने ठरवलं आहे', असा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला. गुरुवारी विलेपार्लेत छात्रभारतीचं संमेलन होणार होतं. पण त्यापूर्वीच ते उधळून लावल्याने पोलिसांच्या दादागिरीचा त्यांनी निषेध केला.


विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

सभा पूर्वनियोजित असूनही सभेच्या एक तास आधी परवानगी नाकारणे म्हणजे सरकारची दडपशाही आहे. राज्यभरातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना हुसकावून लावले. ७०० ते ८०० विद्यार्थ्यांना पकडून ७ ते ८ वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात आल्याची, माहिती कपिल पाटील यांनी दिली. रिचा सिंग, प्रदीप नरवाल यांचे फोन ताब्यात घेऊन त्यांना वाईट वागणूक दिली. हा विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला.


दडपशाहीविरोधात आंदोलन

'चार दिवसांपासून मनोहर ऊर्फ संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी महाराष्ट्राला वेठीला धरले आहे. या दोघांना सरकारने अजून हात लावलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांची गळचेपी केली जात आहे. खऱ्या प्रश्नावर आंदोलन उभे राहू नये. यासाठीच सरकार विष पेरत असल्याचा' आरोप पाटील यांनी केला. या दडपशाहीविरोधात सर्व पक्ष संघटनांनी एकत्र यावे. शेतकरी, बहु‌जन समाजातील मुलांच्या प्रश्नावर आंदोलन उभारण्यासाठी आपण महिनाभरात पुणे, नाशिक, औरंगाबद आणि नागपूरला बैठका घेणार आहोत. शिवाय संघ परिवाराविरोधात नागपूरला पुरोगामींची परिषद घेण्याचा मानस आहे, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.


सरकारला विद्यार्थ्यांची भीती का?

सध्याच्या परिस्थितीत तरुणाई समोरचं प्रश्न या विषयावर आम्ही बोलणार होतो. देशातील विद्यापीठांवर कसा दबाव आणत आहे, त्यांच्यावर कसा हल्ला होत आहे, यावर चर्चा होणार होती. मात्र पोलिसांनी आम्हाला गुन्हेगारांसारखे वागवले. आमच्यासोबत अनेक विद्यार्थ्यांनाही पकडलं. विद्यार्थ्यांची एवढी भीती सरकारला का? असा प्रश्न विद्यार्थी नेत्या रिचा सिंग यांनी केला. हा संविधानिक हल्ला असून हा कार्यक्रम आम्ही देशभरात घेणार आणि लढत राहणार असा निर्धार त्यांनी केला.


सोशल संमेलन

१० जानेवारीला हेच संमेलन सोशल मीडियावर करणार आणि हेच विद्यार्थी नेते भाषण करणार, अशी माहिती छात्रभारतीचे उपाध्यक्ष सागर भालेकर यांनी दिली. यावेळी सरकार तयारीत होते, पुढच्या वेळी आम्ही तयार असू, अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.


हेही वाचा - 

छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, २५० हून अधिकजण ताब्यात


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा