Advertisement

भावी पिढीला करियर कराचंय शेतीतच

भावी पिढीला शेती कामात भविष्य घडवायचं आहे. महापालिका विद्यार्थांच्या एका सर्वेत तर चक्क सर्वाधिक म्हणजे ९.४६ टक्के मुलांना कृषीतज्ज्ञ व्हायचंय. त्याखालोखाल सैनिक आणि पोलीस दलात सामील व्हायला मुलांना आवडेल, असं आढळून आलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून भावी पिढीला पुन्हा शेतीविषयक कामात आवड निर्माण होत आहे, हे एक शुभ संकेत मानले जात आहेत.

भावी पिढीला करियर कराचंय शेतीतच
SHARES

एका बाजूला शेत पिकांना योग्य हमीभाव न मिळाल्याने आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. वाढतं आधुनिकीकरण यामुळे शेतीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, तेथेच दुसरीकडे भावी पिढीला मात्र शेती कामात भविष्य घडवायचं आहे. महापालिका विद्यार्थांच्या एका सर्वेत तर चक्क सर्वाधिक म्हणजे ९.४६ टक्के मुलांना कृषीतज्ज्ञ व्हायचंय. त्याखालोखाल सैनिक आणि पोलीस दलात सामील व्हायला मुलांना आवडेल, असं आढळून आलं आहे.

भारत हा कृषीप्रधान देश असून भावी पिढीला पुन्हा शेतीविषयक कामात आवड निर्माण होत आहे, हे एक शुभ संकेत मानले जात आहेत.


नववीच्या विद्यार्थ्यांसाठी...

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी 'करिअर'च्या दृष्टीने दहावीनंतर कोणतं क्षेत्र निवडावं? या अनुषंगाने त्यांना शास्त्रीय पद्धतीवर आधारित समुपदेशन आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं, या हेतूने गेल्यावर्षीपासून मनपा शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांचं आयोजन करण्यात येत आहे. 'अंतरंग फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात येत आहे.


४० विद्यार्थ्यांचा समावेश

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दर सोमवार ते शुक्रवारपर्यंत रोज तीन तास तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी गटनिहाय संवाद साधतात. यामध्ये साधारणपणे प्रत्येक गटात सुमारे ४० विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यापैकी पहिल्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण आणि त्यांचा कल शास्त्रीय पद्धतीने अभ्यासला जातो.

यादरम्यान संबंधित विद्यार्थ्याचा जो कल लक्षात येईल, त्यानुसार अनुरूप असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या माहितीसह नोकरी आणि व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यांंना दिली जाते. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच पाचव्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा एकदा संवाद साधला जातो.


इतक्या विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस

या उपक्रमात महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणाऱ्या ९.४६ टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस असून त्यांना 'शेतीतज्ज्ञ' व्हायचं असल्याचं आढळून आलं. तर ७.३० टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जाण्याची आणि ७.२५ टक्के विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे.


उपक्रम कधीपासून?

एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या मोफत स्वरुपाच्या उपक्रमाचा गेल्यावर्षी नववीत असणाऱ्या साडे बारा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. याच उपक्रमादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. आता यावर्षी देखील ६ ऑगस्ट २०१८ पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात येणार असल्याचं उपायुक्त (शिक्षण) मिलिन सावंत यांनी स्पष्ट केलं.

यावर्षी नववीचे वर्ग असणाऱ्या २१० मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. हा उपक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतून घेतला जाणार आहे. तसंच गेल्या वर्षीचे अनुभव लक्षात घेऊन यावर्षी या उपक्रमात आवश्यक त्या सुधारणा देखील करण्यात येणार असल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं.

  • शेतीतज्ज्ञ (Agriculturist) :९.४६ टक्के
  • सशस्त्र सेना (Armed Forces): ७.३० टक्के
  • पोलीस सेवा (Police Service) : ७.२५ टक्के
  • पॅरामेडिकल (Paramedical) : ६.९९ टक्के
  • लेखाकर्म (Accountant) : ४.११ टक्के
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा