Advertisement

महापालिकेची पहिली अत्याधुनिक ई लायब्ररी

मुंबई महापालिकेची पहिली अत्याधुनिकई लायब्ररी बोरिवलीत उभारण्यात आली आहे.

महापालिकेची पहिली अत्याधुनिक ई लायब्ररी
SHARES

मुंबई महापालिकेची पहिली अत्याधुनिकई लायब्ररी बोरिवलीत उभारण्यात आली आहे. या लायब्ररीमध्ये तब्बल ७ ते ८ हजार पुस्तके, संगणक कक्ष, अभ्यासिका यासह विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीत सिलिकॉन इमारतीच्या शेजारी ही लायब्ररी सुरू करण्यात आली आहे.

घरात अभ्यासासाठी जागा नाही. खासगी सायबर कॅफेचे इंटरनेटचे दर परवडत नाहीत, अशा सर्वसामान्य घरातील विद्यार्थी आणि मुलांना ही लायब्ररी अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार असून ती विनामूल्य आहे.

शिवसेना नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली ५ हजार फूट जागेत तळ मजला अधिक १ मजला इमारतीत ही लायब्ररी उभारण्यात आली आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या लायब्ररीचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. 

लायब्ररीत एकावेळी ६० विद्यार्थी अभ्यास करू शकतील तसेच या व्यतिरिक्त ९ संगणक असलेली स्वतंत्र ई लायब्ररी बांधण्यात आली आहे. लायब्ररीत विविध शैक्षणिक अभ्यासक्रम, पूरक माहितीची पुस्तके, सामान्य ज्ञान, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यासह विविध प्रकारची सुमारे ८ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सभागृह उभारण्यात आले असून ते २ भागात विभागण्यात आले आहे. या ठिकाणी प्रोजेक्टर लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आपले प्रकल्प तयार करणे, सादर करणे तसेच प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना लेक्चर द्यायचे असल्यास या सभागृहाचा वापर करता येणार आहे.

लायब्ररीत १० जागांचे प्रतीक्षालय उभारण्यात आले आहे. आतमध्ये जागा उपलब्ध नसल्यास आपला क्रमांक येईपर्यंत मुलांना या ठिकाणी बसूनही अभ्यास करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इमारतीबाहेर सायकल स्टँडची सुविधा देण्यात आली आहे.

उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, विकास काय असतो हे शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागात गेल्यावर दिसून येते. काही जण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करतात. आम्ही पुढील पिढी अधिक सुशिक्षित व मेहनतीत कुठेही कमी पडू न देता कशी वाढेल हे पाहून काम करत असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 

अशी आहे लायब्ररी

  • तळमजला अधिक एक मजली इमारत
  • ५ हजार फूट क्षेत्रफळ जागा
  • एकावेळी ६९ विद्यार्थी बसण्याची सोय
  • विविध प्रकारची आठ हजार पुस्तके
  • प्रोजेक्टरसह २ सभागृहांची व्यवस्था
  • १० आसनांचे प्रतीक्षालय, सायकल स्टँड
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा