वडाळा पूर्वेकडील बरकत अली नाका, राजीव गांधी नगर येथे सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक गरोदर गाय गटारात पडून जखमी झाली. काही केल्या तिला बाहेर निघता येईना. शरीरातील सर्व ताकद गमावल्यानंतर अखेर तिने मदतीसाठी हंबरडा फोडला. पहाटे गाईचे हंबरणे ऐकून एक एक करून स्थानिक या गाईभोवती गोळा झाले. गायीला गटारीबाहेर काढण्यासाठी त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी या गाईला गटारीतून बाहेर काढले, तरी उपचाराची जबाबदारी त्यांची नसल्याचे सांगून ते निघून गेले. त्यानंतर अनेक प्राणीमित्र संघटना, पशुवैद्यकीय महाविद्यालयाला माहिती देऊनही या गायीच्या मदतीला कुणीच धावून आले नाही. त्यामुळे ही गाय तब्बल 15 तास रस्त्याच्या कडेला पडून होती. अखेर स्थानिकांनीच पुढाकार घेत या गायीला जेसीबीच्या साहाय्याने उचलून तिच्या मालकाच्या ताब्यात दिले.
राजीव गांधी नगरातील गटारात पडून गाय जखमी झाल्याची घटना समजल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी या गरोदर गायीला गटारातून बाहेर काढले. पण या गायीला रुग्णालयात दाखल करण्याचे काम आपले नसून प्राणी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना कळवा, असे सांगून ते निघून गेले. त्यानुसार परळच्या प्राणी रुग्णालयाला याबाबत माहिती देण्यात आली. प्राणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ या गायीची पाहणी करून आपल्याकडे गाय उचलण्यास सक्षम यंत्रणा नसल्याचे सांगत काढता पाय घेतला. त्यानंतर स्थानिकांनी अनेक प्राणीमित्र संघटनांकडे गायीच्या मदतीसाठी संपर्क साधला. परंतु आश्वासनापलिकडे स्थानिकांच्या हाती काहीच लागले नाही.
अखेर, परिसरात राहणारे निलेश वाळवे, कमलेश शिंदे, मनोहर शिवगण, दावलाल गुप्ता, सागर मढवी, विशाल परुळेकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने गायीच्या मालकाचा शोध घेतला. स्थानिक नगरसेविका स्मिता गावकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या जेसीबीच्या सहाय्याने या गायीला उचलून तिच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत नगरसेविका स्मिता गावकर म्हणाल्या, या गायी अनधिकृतपणे रस्त्यावर मोकाट सोडून दिल्या आहेत. यामुळे रस्त्यावर अनेकदा अपघात होतात. पालिकेच्या एफ/ उत्तर विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही या गायींच्या मालकांवर कारवाई होत नाही.
मोकाट गायींची वाढती संख्या -
वडाळा पूर्वेकडील संगमनगर, शांती नगर, शास्त्रीनगर आदी भागात अनधिकृतपणे गायी पाळण्यात येतात. या गायींची व्यवस्थित निगा राखण्याऐवजी गायींचे मालक त्यांना दिवसभर रस्त्यावर मोकाट सोडून देतात. सायंकाळी दूध काढण्यासाठी ते गायींना घेऊन घेऊन जातात आणि पुन्हा रस्त्यावर सोडून देतात. यामुळे अनेकदा या गायींना अपघात होतो. कित्येकदा तर या गायी जखमी अवस्थेत रस्त्यावर कित्येक तास पडून असतात.