Advertisement

मुंबईतील दिव्यांगाना मिळणार तीन चाकी स्कूटर

अपंग व्यक्ती अधिनियम १९९५च्या कलम ४२ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना रिअल साईड व्हील्ससह स्कूटर पुरवण्याची योजना राबवण्यात येत आहे. मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना आता तीन चाकी स्कूटर दिली जाणार आहे.

मुंबईतील दिव्यांगाना मिळणार तीन चाकी स्कूटर
SHARES

मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना आता तीन चाकी स्कूटर दिली जाणार आहे. महापालिकेच्यावतीने मुंबईतील तब्बल १ हजार ७१ व्यक्तींना ही तीन चाकी स्कूटर दिली जाणार आहे. मात्र, ही स्कूटर दिव्यांगांना आधी खरेदी करावी लागणार असून याच्या खरेदीसाठी महापालिकेच्यावतीने ५६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिव्यांगाला दिले जाणार आहे. मुंबईत दिव्यांगांसाठी तीन चाकी स्कूटर पुरवण्याची योजना प्रथमच राबवली जात आहे.


रिअल साईड व्हील्ससह स्कूटर पुरवण्याची योजना

अपंग व्यक्ती अधिनियम १९९५च्या कलम ४२ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना रिअल साईड व्हील्ससह स्कूटर पुरवण्याची योजना राबवण्यात येत आहे. पण शासनाच्या कल्याणकारी योजनेतंर्गत सुधारीत धोरणानुसार योजनांची अंमलबजावणी करताना वस्तूच्या पुरवठ्याऐवजी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या तीन चाकी स्कूटरची खरेदी संबंधिताने केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ५६ हजार एवढी रक्कम जमा केली जाणार आहे.


दिव्यांगांना मिळणार एवढी रक्कम

होंडा अॅक्टीव्हा स्कूटर ही साईड व्हील लावून ७४ हजार ९२० रुपयांना जीएसटीसह मिळणार आहे. त्यामुळे या रकमेच्या ७५ टक्के अर्थात ५६ हजार एवढी रक्कम दिव्यांगांना स्कूटर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दिली जाणार आहे. यामध्ये सध्या १०७१ लाभार्थींना या योजनेंतर्गत लाभ देता येईल, असे सहाय्यक आयुक्त (नियोजन) डॉ. संगीता हसनाळे यांनी स्पष्ट केले. मात्र या योजनेत लाभार्थीला कोणत्याही ब्रँडच्या स्कूटरची खरेदी करता येईल आणि त्यास कोणत्याही सर्व्हिस सेंटरकडून साईड व्हील्स बसवून घेण्याची मुभा राहिल. अर्थात वाहन आणि साईड व्हील्सची असेंब्ली ही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निश्चित केलेल्या मानकांप्रमाणे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


लाभार्थींनी हे करणे आवश्यक

लाभार्थींनी त्याच्या पसंतीच्या वाहनाची अधिकृत वाहन डिलरकडून थेट खरेदी करावी आणि त्यास साईड व्हील बसवून घ्यावेत. त्याची पक्की पावती घ्यावी, त्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रतींचे दोन संच सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेच्या अर्थसहाय्यातून खरेदी केलेले वाहन लाभार्थीला परस्पर विक्री करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


अशी ठरणार पात्रता

  • लाभार्थी हा मुंबई महापालिका क्षेत्रात राहणारा असावा
  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • १८ ते ६० वयोगटातील व्यक्ती लाभास पात्र
  • दुचाकी चालवण्याचा परवाना
  • कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ३ लाखांपेक्षा कमी असावे
  • शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी कंपनीत कायम नोकरीवर नसावे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा