Advertisement

रात्री 12 पासून औषध दुकानांचं शटर डाउन


रात्री 12 पासून औषध दुकानांचं शटर डाउन
SHARES

ई-फार्मसीला कायदेशीर मान्यता देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातील औषध विक्रेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि या निर्णयाचा निषेध करण्यासाठी देशभरातील लाखो औषध विक्रेते गुरुवारी मध्यरात्री 12 पासून एकदिवसीय संपावर जात आहेत. शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता औषध दुकानं सुरू होतील, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली आहे. त्यामुळे रुग्णांनो जी काही आवश्यक औषध हवी असतील ती गुरुवारीच खरेदी करून घ्या, असं आवाहनही त्यानी केलं आहे.


बंद का?

ई फार्मसीला मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र या ई फार्मसीमुळे लाखो औषध विक्रेत्याच्या आणि फार्मसिस्टच्या पोटावर पाय येणार आहे. तर त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ई फार्मसी शेड्युल एच आणि एच 1 मधील झोपेची आणि गर्भपाताची औषधं सहज उपलब्ध होतील. त्यामुळे नशेचा आणि गर्भपाताचा बाजार वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. असं झाल्यास याचा मोठा फटका तरुण पिढीला बसेल. यासर्व गंभीर बाबी लक्षात घेता ई-फार्मसीला मान्यता देऊ नये, अशी ठाम भूमिका देशभरातील लाखो औषध विक्रेते आणि फार्मसिस्टनी घेतली आहे.


आझाद मैदानात आंदोलन

त्याचाच भाग म्हणून गुरुवारी रात्री 12 वाजल्या पासून मुंबईसह देशभरातील औषध विक्रेते दुकानं बंद ठेवणार आहेत. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून या एकदिवसीय बंदची हाक देण्यात आली आहे. तर शुक्रवारी दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर जमत औषध विक्रेते या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन करणार असल्याचंही नावंदर यांनी सांगितलं आहे.


औषध दुकान 24 तास बंद

मुंबईसह राज्यातील 60 हजार औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानुसार 24 तास औषध दुकान बंद राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार आहे. मात्र त्याचवेळी हॉस्पिटलमधील औषध दुकान सुरू रहाणार आहेत. त्यामुळे या औषध दुकानातून औषधं खरेदी करता येईल हा थोडा दिलासा रुग्णांना असणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय