Advertisement

अटलजींना अंधारात वाहिली श्रद्धांजली

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, या शोक प्रस्तावाच्यावेळी तब्बल पाच वेळा बत्तीगूल झाली. विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे या अंधारातच नगरसेवकांनी आदरांजली वाहिली.

अटलजींना अंधारात वाहिली श्रद्धांजली
SHARES

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी मुंबई महापालिकेच्यावतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता. या शोक प्रस्तावावर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचे आपले अनुभव कथन केले. मात्र, या शोक प्रस्तावाच्यावेळी तब्बल पाच वेळा बत्तीगूल झाली. विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे या अंधारातच नगरसेवकांनी आदरांजली वाहिली.


आठवणींना उजाळा 

मुंबई महापालिकेच्या सभागृहात सोमवारी  माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि नगरसेवक मणिशंकर कवठे यांचं शोकप्रस्ताव मांडण्यात आले होते. प्रारंभी अटल बिहारी वाजपेयी यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी आपण सिध्दीविनायक न्यास समितीचे अध्यक्ष आणि त्यानंतर महापौर असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्याशी झालेला संवाद यातील आठवणींना उजाळा दिला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अटलजींना भेटल्यानंतर एक ऊर्जा प्राप्त व्हायची, अशी आठवण सांगितली.


वारंवार वीज खंडीत 

रवी राजा यांचं भाषण सुरु असतानाच मुख्यालयातील वीज गुल झाली. त्यानंतर भाजपाचे गटनेते मनोज कोटक मनोगत मांडत असताना दुसऱ्यांदा वीज गेली. ३० सेकंदामध्ये पुन्हा वीज आल्यानंतर भाषणाला सुरुवात करत कोटक यांनी नदी जोडो अभियान आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना अटलजींच्या काळात सुरु झाल्याचं सांगत सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी आदरयुक्त वागून आणि एकमेकांना विश्वासात घेऊन वागल्यास हीच खरी अटलजींना श्रद्धांजली ठरेल, असं सांगितलं. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटे, ५ वाजून ३५ मिनिटे आणि त्यानंतर ५ वाजून ४४ मिनिटाला वीज गेली. त्यातही सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली होती. 


अटलजी आणि मणिशंकर कवठे 

अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर महापालिका सभागृहात माजी नगरसेवक मणिशंकर कवठे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. अटलजींचं निधन झाल्याचं गुरुवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आलं. तर मणिशंकर कवठे यांचं निधन गुरुवारी दुपारी झालं होतं. दोघांचंही वय ९३ होतं. अटलजींनी ९ वेळा खासदार बनण्याचा मान पटकावला होता. आणि मणिशंकर कवठे  सलग आठ वेळा महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. या दोन्ही व्यक्तिमत्वांना एकाच दिवशी एकाच सभागृहात श्रध्दांजली वाहण्याचा योग जुळून आला. मणिशंकर कवठे हे सन २००२ पर्यंत महापालिकेचे सदस्य होते.हेही वाचा - 

मेट्रो-२ बी विरोध: स्थानिक करणार 'नोटा'चा वापर

सिडकोने बनवलं खास लाॅटरीसाठी 'अॅप'
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा