Advertisement

शहर स्वच्छ करायला यांत्रिक झाडूची गरज काय?


शहर स्वच्छ करायला यांत्रिक झाडूची गरज काय?
SHARES

मागील स्थायी समितीत सदस्यांनी यांत्रिक झाडूंची मागणी केल्यानंतर मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवर यांत्रिक झाडूने साफसफाई करण्यात येत आहे. परंतु, आता हीच यांत्रिक झाडूने होणारी साफसफाई स्थायी समितीच्या नव्या सदस्यांना नकोशी झाली असून याच्याऐवजी मानवी बळाचा वापर करून साफसफाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


नगरसेवकांनी वाचला तक्रारींचा पाढा

मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावर करण्यात येणाऱ्या यांत्रिक झाडूच्या सफाई कंत्राटाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला. त्यावेळी भाजपाच्या सुनिता यादव यांनी याला आक्षेप घेतला. 'तिसऱ्यांदा ही मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे एकदाच निविदा मागवून काम दिले जावे', अशी मागणी त्यांनी केली. तर भाजपाच्या अलका केरकर यांनी यांत्रिक झाडूने साफसफाई योग्य प्रकारे होतच नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी या यांत्रिक झाडूद्वारे अपेक्षित सफाई होत नसल्याची खंत व्यक्त केली. मनुष्यबळाचा वापर करून सफाई केल्यास अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता राखता येईल, असे त्यांनी सांगितले.


ए वॉर्डमध्ये यांत्रिक झाडूबंदी?

यांत्रिक झाडू द्रुतगती मार्गावर ठीक आहेत, परंतु एस. व्ही. रोड आणि लिकिंग रोडसारख्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असल्यामुळे त्या ठिकाणी या झाडूचा वापर योग्य प्रकारे होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील ए विभागात यांत्रिक झाडू पूर्णपणे बंद आहेत. मग इतर विभागात का वापरले जातात? असा सवालही त्यांनी केला.


यांत्रिक झाडूंसाठी फेरनिविदा

प्रशासनाकडून प्रमुख अभियंता राजवाडकर यांनी, 'आतापर्यंत तीन वेळा यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे' सांगितले. मागील वेळी ४७ टक्के अधिक दराने निविदा आल्याने फेरनिविदा मागवण्यात आली आहे. मात्र, ए विभागात योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्यामुळे तिथे यांत्रिक झाडूने सफाई बंद करण्यात आली आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराला नवीन मशिनरीज आणण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नवीन यांत्रिक झाडू आल्यानंतर तिथेही पुन्हा सफाई सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले.


वेगमर्यादा पाळण्याचे बंधन

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मे २००५मध्ये सेंटाॅर जंक्शन येथे यांत्रिक झाडूच्या वाहनाला धडक बसून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. या गाडीचा वेग कमी असल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नाही. परिणामी या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यांत्रिक झाडूच्या वाहनांवर वेग कमी असल्याचा फलक लावतानाच काही ठराविक वेगाची मर्यादा घालून नवीन कंत्राटासाठी निविदा मागवण्यात येत असल्याचे समजते.



हेही वाचा

यांत्रिक झाडू सफाईत कंत्राटदाराची हातसफाई, दोन तासातच आठ रस्ते साफ!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा