Advertisement

नवरात्रीचे तीन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

जिल्हाधिकाऱ्यांकडून काही अटी आणि बंधनेही घातली गेली आहेत.

नवरात्रीचे तीन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी
SHARES

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गरब्याच्या आयोजनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे गरबा प्रेमींना गरब्याचा आनंद घेता आला नव्हता. त्यामुळे आता सरकारने मुंबईकरांसाठी शेवटचे तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारपासून तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा-दांडिया खेळता येणार आहे.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (29 सप्टेंबर), अष्टमी (30 सप्टेंबर) आणि नवमी (1 ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. त्यामुळे या तीन दिवसांत रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र रात्री 12 वाजेपर्यंत गरबा, दांडियासाठी परवानगी देण्यात आली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांकडून काही अटी आणि बंधनेही घातली गेली आहेत.

-परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.

-उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

-शासनाने घोषित केलेल्या शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू होणार नाही.

-ध्वनी प्रदूषण नियम, 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करणे आवश्यक राहील.

-तक्रारी आल्यास ध्वनी प्राधिकरणाला पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत कार्यवाही करण्याचा अधिकार राहील.

-आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, नवरात्रोत्सवातील सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

मात्र ठरवलेल्या मर्यादा आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेल, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा