Advertisement

वसई विरार मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सादर

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

वसई विरार मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सादर
SHARES

वसई-विरार शहरातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे वसई-विरार (virar) शहरात गर्दीचे प्रमाणही वाढत आहे. वसई-विरारपर्यंत मेट्रोचे (metro) जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

मुंबई (mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) आयुक्त संजय मुखर्जी यांनी मेट्रो मार्ग 13 चा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि मंत्रिमंडळाची टिप्पणी राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठवली आहे.

त्यामुळे येत्या काळात वसई ते मुंबई प्रवास अधिक वेगवान होणार असून वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन या सल्लागार संस्थेने मेट्रो मार्ग 13(मीरा-भाईंदर (bhayandar) ते वसई-विरार) चा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आहे.

या अहवालाला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची मान्यता घेण्यासही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

या प्रकल्पाची एकूण लांबी 25.03 किमी असून त्यापैकी 3.25 किमी भुयारी आणि 21.78 किमी उन्नत मार्ग असणार आहे.

या मार्गावर 16 स्थानके प्रस्तावित असून, दुरुस्ती व देखभालीसाठी चिखलडोंगरी-विरार येथे आगार उभारण्यात येणार आहे.

मेट्रो मार्ग 13 हा मेट्रो मार्ग 9 (दहिसर ते मीरा-भाईंदर) शी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे हा मार्ग मेट्रो मार्ग 9, 7 आणि 7-अ यांच्याशी जोडला जाईल.

तसेच वसई खाडीवरून मेट्रो आणि सहापदरी रस्त्याचा एकत्रित पूल उभारण्याचेही नियोजन आहे.

या मेट्रो मार्गामुळे वसई-विरार परिसरातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अंधेरीकडे जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

यामुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडी, अपघात, ध्वनी आणि हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

वसई-विरारमध्ये मेट्रो यावी, यासाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एमएमआरडीएने 350.96 किमी लांबीच्या 14 मेट्रो मार्गांचा बृहत आराखडा तयार केला आहे.

तसेच त्यापैकी काही मार्ग प्रवाशांसाठी खुले झाले असून उर्वरित मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे.



हेही वाचा

राज्य सरकारचा 'बाईक टॅक्सी ॲप्स'वर कडक कारवाईचा आदेश

राज्य सरकार पोलिसांना लवकरच घरे देणार


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा