• मुंबईच्या टोईंगमधून विदर्भ इन्फोटेकची चांदी
SHARE

मुंबईतील वाहन टोईंगच्या कंत्राटामधून विदर्भ इन्फोटेक कंपनीने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून पोलिसांचे मात्र त्यात प्रचंड नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आणली आहे. यापूर्वी मुंबईतील टोईंगचे कंत्राट वेगवेगळ्या कंपन्यांना विभागानुसार दिले जात होते. त्यातून वाहतूक पोलिसांना अधिक रक्कम मिळायची. मात्र डिसेंबर २०१६ पासून संपूर्ण मुंबईसाठी वाहन टोईंगचे कंत्राट विदर्भ इन्फोटेक या एकाच कंपनीला देण्यात आले आहे. मात्र हे कंत्राट देतानाही कंत्राटदाराचा फायदा बघितल्याचे या माहितीवरून उघड होतंय.


शासनाचा तोटा, कंत्राटदाराचा फायदा

गेल्या एका वर्षात टोईंगच्या माध्यमातून विदर्भ इन्फोटेक कंपनीला ९ कोटी २२ लाख रुपये तर मुंबई वाहतूक पोलिसांना ५ कोटी ९१ लाख रुपये मिळाले आहेत. यावरून या कंत्राटात शासनाचा तोटा तर कंत्राटदाराचा फायदा झाल्याचे समोर झाले अाहे.पोलिसांकडे विदर्भ इन्फोटेकची माहिती नाही

विदर्भ इन्फोटेकला दिलेल्या कंत्राटाबाबतही यापूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे या कराराचे पुनर्निरीक्षण करण्याची मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अनिल गलगली यांनी मेसर्स विदर्भ इन्फोटेक कंपनीच्या संचालक मंडळाची यादी आणि वार्षिक लेखा परीक्षणाची प्रत माहिती अधिकारात मागितली असता, अशी कोणतीही माहिती अभिलेखावर नसल्याचे त्यांना वाहतूक पोलिसांनी कळवलं आहे.


डिसेंबर २०१६पासून सेवा सुरू

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सहपोलीस आयुक्त, वाहतूक विभागाकडे टोईंगसाठी मेसर्स विदर्भ इन्फोटेक कंपनीला दिलेल्या कंत्राटाची माहिती मागितली होती. वाहतूक कोषाचे अशोक शिंदे यांनी अनिल गलगली यांस कळविले की, सदर टोईंगसाठीची सेवा डिसेंबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे.


९ कोटींची रक्कम वसूल

३० नोव्हेंबरपर्यंत सदर प्रकरणात एकूण ५ कोटी ९१ लाख ६७ हजार ८०० रुपये इतकी तडजोड रक्कम सरकारी खात्यात जमा करण्यात अाली अाहे. तर मेसर्स विदर्भ इन्फोटेक कंपनीने कर्षित वाहन शुल्क म्हणून ९ कोटी २२ लाख ३७ हजार १४८ रुपये इतकी रक्कम वसूल केली अाहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या