
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाइन तिकीट प्रणाली लागू करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ येथील पारंपरिक तिकीट प्रणाली आता डिजिटल स्वरूपात बदलली जाणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिली.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमधील प्रवासी जलवाहतुकीसाठी ऑनलाइन तिकीट वितरण आणि विक्री प्रणाली सुरू करण्याबाबत मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, वर्सोवा-मढ येथील पारंपरिक तिकीट प्रणालीला आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि खासगी भागीदारांच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पांतर्गत मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक डिजिटल पास सुरू करण्याची योजना आहे.
पुढील तीन महिन्यांत किमान 50 टक्के व्यवहार ऑनलाइन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दररोज होणाऱ्या सुमारे 22 हजार तिकीट व्यवहारांपैकी किमान 11 हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचा उद्देश आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जलवाहतुकीत डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऑनलाइन तिकीट प्रणालीमुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही, तिकीट प्रक्रिया अधिक जलद होईल आणि संपूर्ण व्यवस्था अधिक पारदर्शक बनेल.
प्री-मॉन्सून काळात जलवाहतूक सेवा वेगाने सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच Gateway of India, Belapur, Elephanta Caves आणि DCD टर्मिनल मार्गांवरील सेवा लवकर सुरू करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा
