Advertisement

रक्तदानच नव्हे, पेशीदान करण्यासाठीही पुढे या!


रक्तदानच नव्हे, पेशीदान करण्यासाठीही पुढे या!
SHARES

मुंबईत कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तोंडाचा कर्करोग असो वा रक्ताचा, अशा रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्सची गरज असते. केमोथेरेपी या उपचारात कर्करुग्णांच्या प्लेटलेट्स म्हणजेच पांढऱ्या पेशी कमी होण्याची शक्यता असते. पण, प्लेटलेट्स दान करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही वेळा रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे रक्तदानासोबतच प्लेटलेट्स दान करणेही तेवढेच गरजेचे आहे. मात्र, सर्वसामान्यांमध्ये प्लेटलेट्स दान करण्याच्या दृष्टीने तितकीशी जागरुकता नसल्याने प्लेटलेट्स दात्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्लेटलेट्स दात्यांची संख्या वाढण्यासाठी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत टाटा रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील राजाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे.

रक्तदानानंतर रक्तातील अन्य घटक, प्लाझ्मा आणि पांढऱ्या पेशी, वेगळे केले जातात. पूर्वी पालिका किंवा सरकारी रुग्णालयात पांढऱ्या रक्तपेशी वेगळ्या करण्याची मशीन उपलब्ध नव्हते. पण, आता सर्व रुग्णालयात रक्तघटक वेगळे करण्याची मशिन उपलब्ध झाली आहे. म्हणून प्लेटलेट्स दान करण्याची पद्धतही सोपी झाली आहे. रक्तातून प्लेटलेट्स वेगळी करणारी ‘डिस्पोजेबल सेपरेट’ नावाची मशिन आहे. पालिका आणि सरकारी रुग्णालयात प्रत्येकी एक मशिन कार्यरत आहे. परळ येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयात रक्तातून प्लेटलेट्स वेगळ्या करण्याच्या पाच मशिन उपलब्ध आहेत. टाटा रुग्णालयात सोमवारी डॉ. राजाध्यक्ष यांनी हे मशीन रक्तातील घटक कसे वेगळे करते? यासंदर्भात माहिती दिली.

प्लेटलेट्स म्हणजे काय?

हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणेच प्लेटलेट्स(पांढऱ्या पेशी) हासुद्धा रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचे तसेच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचे काम या प्लेट्लेट्स करत असतात. रक्ताचे एक युनिट पाच ते सहा आठवडे साठवता येते. प्लेटलेटसचे एक युनिट तयार करण्यासाठी सहा ते आठ रक्तदात्यांकडून मिळालेल्या रक्तातील प्लेटलेट्स गोळा कराव्या लागतात. याला 'रॅण्डम डोनर प्लेटलेट्स' (आरडीपी) म्हणतात. एकाच रक्तदात्याकडून आलेल्या प्लेटलेट्सला 'सिंगल डोनर प्लेटलेट्स' (एसडीपी) म्हणतात. एसडीपी हा तुलनेने उत्तम दर्जाचा प्रकार समजला जातो. यात रक्तदात्याकडून पूर्ण रक्त न घेता त्याच्या रक्तातून प्लेटलेट्स काढून उर्वरित रक्त पुन्हा शरीरात सोडले जाते.

पांढऱ्या पेशी दान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असल्याने रुग्णांना त्या लगेच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रक्तदान करतानाच दात्याच्या रक्तातील प्लाझ्मा आणि पांढऱ्या पेशी वेगळ्या केल्या जातात. दात्याच्या शरीरातील रक्त काढण्यासाठी ‘डिस्पोजेबल सेपरेट’ नावाची मशिन उपलब्ध आहे. त्याद्वारे रक्त काढले जाते. अन्य दोन पिशव्यांमध्ये रक्तदान सुरू असताना रक्तातील प्लाझ्मा आणि पांढऱ्या पेशी त्या-त्या पिशवीत जमा होतात. या पांढऱ्या पेशींची साठवणूक करुन गरजेनुसार रुग्णांना दिल्या जातात. पण, याची संख्या खूपच कमी असल्याने बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन पांढऱ्या पेशी खरेदी कराव्या लागतात. यामुळे आधीच उपचाराचा खर्च जास्त असताना नातेवाईकांना पांढऱ्या पेशींसाठी अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लेट्लेट्स दान होणे गरजेचे असून रक्तदान शिबिरांमध्ये प्लेटलेट्स दान करण्यासंदर्भात जागरुकता निर्माण केली पाहिजे, असेही डॉ. राजाध्यक्ष यांनी म्हटले आहे.



  • पांढऱ्या पेशी दान करणाऱ्यांची संख्या कमी
  • कर्करोगग्रस्तांना मोठ्या प्रमाणात पांढऱ्या पेशींची आवश्यकता
  • रक्तदान करतानाच पांढऱ्या पेशी स्वतंत्र करणं शक्य
  • पेशी दान केल्यानंतर 4 दिवसांत दात्याच्या शरीरात दुप्पट पेशी तयार होतात
  • 15 दिवसांत पुन्हा पेशी दान करणं शक्य
  • अधिकाधिक लोकांनी पेशीदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज


उन्हाळ्यात रक्तदान शिबिरे होत नसल्याने रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासतो. केईएम रुग्णालयात हृदयरोगी आणि हिमोफेलिया रुग्णांना रक्तातील पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात पुरवल्या जातात. पण, दात्यांची संख्या कमी असल्याने पांढऱ्या पेशींची संख्या अपुरी पडू लागली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात अडीच लाखांहून अधिक पांढऱ्या पेशी असतात. या पेशी दान केल्यानंतर अवघ्या चार दिवसांत त्यात दुपटीने वाढ होते. त्यामुळे एकदा दान केल्यानंतर 15 दिवसांत ती व्यक्ती पुन्हा पांढऱ्या पेशी दान करू शकते. पण, लोकांना यासंदर्भात माहितीच नाही. त्यामुळे प्लेटलेट्स दान करण्याबाबत जागरूकता निर्माण व्हायला हवी, असे केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत कार्यरत संगीता कसबेकर यांनी सांगितले.

देशात वर्षाला साधारणतः 1 कोटी 12 लाख युनिट रक्ताची गरज लागते. त्यापैकी सुमारे 1 कोटी युनिट रक्त गोळा होते. तर, 70 हजार सिंगल डोनर प्लेटलेट्सची गरज असते. फक्त टाटा रुग्णालयात रोज 200 आरडीपी आणि 20 एसडीपी रक्त लागते, असे कर्करोग तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा