Advertisement

मुंबईतील कचऱ्यातील घट कशामुळे? डेब्रिजच्या 'पोलखोल'चा परिणाम

मुंबईतील २ हजार ३०० मेट्रीक टन कचऱ्यात घट झाल्याचा दावा महापालिका आयुक्त अजोय मेहता करत आहेत. परंतु ही घट कचरा वर्गीकरण किंवा कचऱ्यावरील प्रक्रियेमुळे झालेली नसून कचऱ्यात डेब्रिज मिसळून वजन वाढण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे झाल्याची माहिती उपायुक्त विजय बालमवार यांनी स्थायी समितीत दिली.

मुंबईतील कचऱ्यातील घट कशामुळे? डेब्रिजच्या 'पोलखोल'चा परिणाम
SHARES

ओला व सुका कचरा यांचं वर्गीकरण तसंच ओल्या कचऱ्यापासून निर्माण केलेलं खत यामुळे मुंबईतील २ हजार ३०० मेट्रीक टन कचऱ्यात घट झाल्याचा दावा महापालिका आयुक्त अजोय मेहता करत आहेत. परंतु ही घट कचरा वर्गीकरण किंवा कचऱ्यावरील प्रक्रियेमुळे झालेली नसून कचऱ्यात डेब्रिज मिसळून वजन वाढण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे झाल्याची माहिती उपायुक्त विजय बालमवार यांनी स्थायी समितीत दिली.


भ्रामक चित्र?

२०१५ पासून दररोज सरासरी ९ हजार ५०० मेट्रीक टन एवढा कचरा मुंबईतून उचलला जायचा. महापालिकेने कचरा कमी करण्याच्या दृष्टीने राबविलेल्या सर्वस्तरीय उपयायोजनांमुळे या कचऱ्याचं प्रमाण दररोज सरासरी ७ हजार २०० मेट्रीक टनांपर्यंत एवढं कमी झाल्याची आकडेवारी गेल्या शनिवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिली होती. त्यानुसार २ हजार ३०० मेट्रीक टन कचरा कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. ही सर्व घट ओला व सुका कचरा वर्गीकरण तसंच कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबवल्यामुळे होत असल्याचं चित्र प्रशासनाच्यावतीने रंगवलं जात आहे.


प्रशासनाला धारेवर

मात्र, बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत कचऱ्यातील डेब्रिज भेसळ घोटाळाप्रकरणी कचरा कंत्राटदारांविरोधात सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर, उपायुक्त विजय बालमवार यांनी कचरा डेब्रिज घोटाळाप्रकरणी २ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं असून उर्वरीतांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी विनंती वजा तक्रार अर्ज केला होता. परंतु त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असं सांगितलं.


म्हणून भरला कचरा कमी

कंत्राटदारांना चार वेळा दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु पाचव्यांदा तसाच प्रकार आढळून आल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येतं. त्यामुळे दंडात्मक कारवाई करतानाच पोलिस ठाण्यात केवळ शिस्त आणि भीती निर्माण व्हावी म्हणून तक्रार केली होती.

त्यामुळेच दैनंदिन कचऱ्याचं प्रमाण प्रथम ९५०० मेट्रीक टनावरून ८ हजारांवर आलं होते. त्यानंतर ते ७२०० मेट्रीक टनावर आलं आहे. डेब्रिज भेसळ प्रकरणी कंत्राटदारांना दंडीत तसेच पोलिस ठाण्याची भीती दाखवल्यानंतर हे कचऱ्याचं प्रमाण कमीत कमी होत असल्याचं आढळून आलं, अशी माहिती बालमवार दिली यांनी दिली.


चौकशीची मागणी

दरम्यान, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून कचऱ्याच्या प्रमाणात झालेली घट ही डेब्रिज भेसळ प्रकरण उघडकीस आल्यानंतरची आहे. त्यामुळे या घट झालेल्या कचऱ्याची तसंच डेब्रिज भेसळ प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी राजा यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे दोनच दिवसांपूर्वी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा