Advertisement

माटुंग्याच्या कमला रामन नगरला रेल्वेची नोटीस


माटुंग्याच्या कमला रामन नगरला रेल्वेची नोटीस
SHARES

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीनंतर अनेक रेल्वे स्टेशन परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरोधात कारवाई करण्यात आली. त्यातच आता पश्चिम रेल्वेने अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईचा बडगा उचलत माटुंगा पश्चिम येथील कमला रामन नगरमधील सुमारे ४०० कुटुंबांना पश्चिम रेल्वेच्यावतीने जागा खाली करण्यासंदर्भात नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. १९६५ पासून ही वस्ती येथे वसलेली आहे. रेल्वेने यासर्व कुटुंबांना सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस जारी केल्याने येथील कुटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत.



आता पर्यायी जागा कुठे मिळणार?

एकीकडे रेल्वेच्या जागेवरील कुटुंबाचे तेथेच बांधकाम करून पुनर्वसन करण्याचा केंद्र तथा राज्य सरकारचे धोरण असताना, नक्की रेल्वे पर्यायी जागा कुठे देणार असा प्रश्न येथील कुटुंबाना पडला आहे. त्यामुळे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि रेल्वे प्रशासनाला काय निर्देश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


प. रेल्वेच्या मालमत्ता विभागाच्यावतीने बजावली नोटीस

माटुंगा पश्चिम येथे दादर माटुंगा नाला लगत मध्य रेल्वेचे वर्कशॉप आणि पश्चिम माटुंगा रेल्वे स्थानकाच्या मधोमध रेल्वेच्या भूखंडावर कमला रामन नगर सेवा संघ नावाची मोठी वस्ती वसलेली आहे. माटुंगा पश्चिम स्थानकाच्या अगदी समोर रेल्वे वसाहतीच्या मागील बाजूस असलेल्या वस्तीत सुमारे ४०० कुटुंबे राहत आहेत. मात्र, यासर्व कुटुंबाना शनिवारी पश्चिम रेल्वेच्या मालमत्ता विभागाच्यावतीने नोटीस जारी केली.



येथे बायोमेट्रिक सर्वे होणार

रेल्वेने बजावलेल्या या नोटीसमध्ये त्यांनी ही वस्ती अनधिकृत असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे येथील कुटुंबाना गटागटाने सुनावणीसाठी उपस्थित राहून आपल्याकडील अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. एकाबाजूला रेल्वेच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वे करण्यात येणार आहे. या सर्वेला येथील सर्व कुटुंबांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवलेली असताना, अचानक रेल्वेने बजावलेल्या नोटीसीमुळे येथील कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहेत.


रेल्वेला सहकार्य करण्याची येथील कुटुंबाची तयारी

स्थानिक रहिवाशांनी, आपण रेल्वेला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. येथील सर्वच कुटुंबे १९६५ च्या नंतरची तसेच १ जानेवारी १९९५ च्या पूर्वीची आहेत. त्यामुळे सर्वच कुटुंबे पात्र आहेत, परंतु घरांची जागा खाली करून दिल्यावर आम्हा सर्वांचे पुनर्वसन कुठे होईल, याबाबत कुठेही स्पष्टता नसल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. या वस्तीत आमची दुसरी तसेच तिसरी पिढी राहत आहे, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

स्थानिक शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रेल्वेच्या जागेवरील कुटुंबांचे तिथेच पुनर्वसन व्हावे, यासाठी 'एसटीपी' प्रकल्प राबवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.


'मुख्यमंत्र्यांसोबत घेणार बैठक'

मागील ३ वर्षांपासून आपला हा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे जागेवरील कमला रामन नगर वस्तीला जागा खाली करण्याची नोटीस दिल्याचे समजताच बायोमेट्रिक सर्वे करण्याची मागणी पश्चिम रेल्वेकडे केली आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली जाईल, असे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा