SHARE

मुंबईतील महापालिकेच्या ए विभाग कार्यालयातील ५४ वाहनतळांपैकी १३ गटांमधील २८ वाहनतळांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये ५ वाहनतळाची कंत्राटे ही महिला बचत गटांना देण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन वाहनतळे ही सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थाना देण्यात आली आहेत. तर उर्वरीत वाहनतळांवर खुल्या गटांमध्ये कंत्राटदारांना देताना तब्बल २१ वाहनतळांची कंत्राटे त्यांना बहाल करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांना वाहनतळांच्या कंत्राटांमध्ये सामावून घेतल्या. अखेर महिला बचत गटांचे स्वप्न साकार झाले असले तरी प्रत्यक्षात महिला बचत गटांच्या अल्पप्रतिसादामुळे त्यांच्या हातची वाहनतळांची कंत्राटे पुन्हा प्रस्थापित कंत्राटदारांकडे गेली आहे.


५४ वाहनतळांच्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया

मुंबईतील वाहनतळांच्या कंत्राटामध्ये महिला बचत गटांसाठी ५० टक्के, सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांसाठी २५ टक्के आणि खुल्या प्रवर्गांमध्ये २५ टक्के अशाप्रकारे सामावून घेण्यासाठी निविदा मागवण्याचे धोरण बनवण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयातर्फे ५४ वाहनतळांच्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यामध्ये १३ गटांमध्ये विभागून २८ वाहनतळांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिला बचत गटांच्या संस्था आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांकडून फारसा प्रतिसाद न आल्यामुळे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या वाहनतळांवर प्रस्थापित कंत्राटदारांनी कामे पदरात पाडून घेतली आहे.


कंत्राटदारांची या कालावधीपर्यंत नियुक्ती

१३ गटांमधील २८ वाहनतळांमध्ये ५ वाहनतळे ही महिला बचत गटांच्या संस्था तर ४ वाहनतळे ही सुशिक्षित बेरोजगारांची संस्था तर उर्वरीत २१ वाहनतळे ही प्रस्थापित कंत्राटदारांनी मिळवली आहे. यासर्व कंत्राटदारांना कार्यादेश देऊन ५ फेब्रुवारी २०१८ ते ४ फेब्रुवारी २०१८ या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.


कंत्राटांची निविदा प्रक्रिया सुरू

१३ गटांमध्ये निविदा काढताना महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार महिला आणि खुल्या वर्गासाठी राखीव ठेवून वाहनतळांसाठी निविदा मागवली होती. पण प्रत्यक्षात महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार संस्थांकडे अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नसल्यामुळे त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. पण त्यातही त्यांच्याकडून प्रतिसाद न लाभल्याने अखेर या दोन्ही संस्थाच्या वाट्याला जाणारी वाहनतळे ही खुल्या गटांसाठी वर्ग करून त्यानुसार त्यासाठी निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही कामे खुल्या प्रवर्गातून देण्यात आली असल्याचं ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं. सध्या १३ गटांमध्ये २८ वाहनतळांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना कंत्राटे देण्यात आली आहे. उर्वरीत गटांमधील कंत्राटांची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे दिघावकर यांनी सांगितलं.


महिला बचत गटांना या वाहतनळांचे कंत्राट

१)बेस्ट रोड (पालक महिला बचत गट)
२)नागीनदास मास्टर लेन (प्रेरणा महिला बचत गट)
३)स्टोरलेन (हरिओम स्वयंसहायता महिला बचत गट)
४)ऍश लेन (नंदा महिला बचत गट)
५)क्रॉफर्ड मार्केट नं १,२,३ (उज्ज्वल महिला बचत गट)


सुशिक्षित बेरोजगार संस्थांना वाहनतळांचे कंत्राट

१)जहाँगिर आर्ट गॅलरी आणि गांधी रोड (साई सिध्दी सु.बे. संस्था)
२)हुतात्मा चौक नं ३(अविनाश सु.बे. संस्था)


खुल्या प्रवर्गात काम मिळवणाऱ्या कंत्राटदारांची नावे

  • एम. एम. टेड्रर्स
  • ओम साईनाथ एंटरप्रायझेस
  • अशोक एंटरप्रायझेस
  • जय सिक्युरिटी सर्विसेस
  • आर. टी. कॉर्पोरेशन (१७ वाहनतळांचे कंत्राट)
संबंधित विषय
ताज्या बातम्या