Advertisement

परिसर स्वच्छ ठेवणाऱ्यांना बांधल्या राख्या, 'वुमन वेल्फेअर एएलएम'चा उपक्रम


परिसर स्वच्छ ठेवणाऱ्यांना बांधल्या राख्या, 'वुमन वेल्फेअर एएलएम'चा उपक्रम
SHARES

बोरीवली पूर्वेकडील आय.सी. कॉलनीमधील 'वुमन वेल्फेअर एएलएम' च्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक कामे हाती घेतली जातात. रक्षाबंधनानिमित्त देखील 'वुमन वेल्फेअर'ने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या दिवशी 'एएलएम'च्या महिला सदस्यांनी परिसरातील महापालिका कर्मचारी तसेच मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा तर केलाच, पण त्याचसोबत ई-वेस्ट मोहीम आयोजित करून त्याअंतर्गत ५५० किलो ई-वेस्टही जमा केला.

रक्षाबंधनाच्या दिवशी 'वुमन वेल्फेअर एएलएम'च्या महिला सदस्यांनी सकाळी सर्वप्रथम महापालिकेतील घनकचरा विभाग, पेस्ट कंट्रोल, पाणी इ. विभागातील कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या. त्याचबरोबर मुंबई पोलीस वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनाही राख्या बांधल्या.



त्यानंतर या महिला सदस्यांनी 'वुमन वेल्फेअर एएलएम' च्या प्रमुख मार्गदर्शक युआन डिसूझा यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातून ५५० किलो ई-वेस्ट गोळा केला. हा सर्व कचरा रिसायकलींग करणाऱ्या कंपनीकडे जमा करण्यात आला.



आय.सी कॉलनी परिसर स्वच्छ कसा राहील याकडे गेल्या ३५ वर्षांपासून ५५ वर्षांच्या युआन डिसूझा लक्ष देत आहेत. अथक मेहनत करणाऱ्या डिसूझा यांना या कामात महापालिकेच्या 'अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट'(एएलएम)ने चांगली साथ दिली. 'एएलएम'ची स्थापना करून त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्यासाेबतच परिसराचा विकास करण्याकडेही विशेष लक्ष दिले आहे.



या उपक्रमात सहभागी होण्याअगोदरपासून डिसूझा या भागात कार्यरत होत्या. मात्र २००५ साली 'वुमन वेल्फेअर एएलएम'ची स्थापना होताच त्यांना महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही साथ मिळाली. ही साथ मिळताच त्यांनी स्वच्छता, विकास आणि महिला सशक्तीकरण या विषयावर महिलांचे प्रबोधन करण्यास सुरूवात केली. सद्यस्थितीत ४०० महिलांना त्या मार्गदर्शन करत आहेत.



महिला प्रबोधनाच्या माध्यमातूनच परिसराचा विकास साधण्यास मदत झाल्याचे त्या सांगतात. फक्त स्वत:चे घर स्वच्छ ठेवल्यास परिसर स्वच्छ दिसू शकत नाही. पण परिसर स्वच्छ ठेवल्यास आपले घरही स्वच्छ होते. हा संदेश सर्व महिलांनी आत्मसात केल्याचे डिसूझा म्हणाल्या.

परिसर स्वच्छतेचे महत्त्व ओळखूनच 'एएलएम'च्या वतीने आय.सी.कॉलनी स्वच्छ ठेवणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या.


मुलगी शिकली तर प्रगती होते. हा संदेश ज्याप्रकारे घरोघरी पोहोचल्याने लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला लागला आहे. त्याचप्रकारे स्वच्छतेबाबत महिलांचे प्रबोधन केल्यास परिसर नक्कीच स्वच्छ राहू शकतो. आय.सी. कॉलनी त्याचे उत्तम उदाहरण आहे.

- सुभाष पाटील, एएलएम अधिकारी, महापालिका



हे देखील वाचा -

चौपाटी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आमचीही



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा